अभिनेता सुशांत शेलार याने अनेक मराठी चित्रपटांमधून आपल्या उत्तम अभिनयाची झलक दाखवली आहे. अशीच एक निराळी भूमिका तो पुन्हा एकदा साकारत आहे. ‘झी टॉकीज’ वाहिनीच्या ‘गोल गोल गरा गरा’ या टॉकीज ओरिजिनल चित्रपटात भाई दांडेकर या ब्रह्मचारी व्यक्तीची भूमिका त्याने साकारली आहे. या विनोदी भूमिकेविषयी त्याने मारलेल्या या दिलखुलास गप्पा;

१. ‘गोल गोल गरा गरा’ या चित्रपटामधील तुझ्या भूमिकेविषयी थोडंसं सांग.
भाई दांडेकर या मोठ्या भावाची भूमिका या चित्रपटात मी साकारली आहे. आजपर्यंत केलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे, त्यामुळे ती साकारताना खूप मजा आली. चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल काळे यांच्यासोबत यानिमित्ताने मी पहिल्यांदाच काम केले आहे. संपूर्ण टीमच्या उत्तम सहकार्यामुळे हे पात्र छान जमून आले आहे.

२. सुशांत आणि भाई यांच्यात काही साम्य आहे का?
स्त्रियांची भीती दाखवणारे कुणीही दादा दांडेकर माझ्या घरात नाहीत. माझा स्वभाव सुद्धा भाईसारखा लाजराबुजरा अजिबातच नाही. मी एकदम ‘हॅप्पी गो लकी’ माणूस आहे. त्यामुळे सुशांत आणि भाईमध्ये कुठलेही साम्य आहे असं मी म्हणणार नाही.३. या चित्रपटात तू थोड्या निराळ्या धाटणीची भूमिका साकारली आहेस. यासाठी काही खास तयारी करावी लागली का?
मी आधी म्हणालो त्याप्रमाणे, वेगळ्या प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मला या चित्रपटामुळे मिळाली आहे. वेगळी भूमिका करत असल्याने काम करायला खूप मजा आली. विनोदी पात्र साकारायचे होते त्यामुळे अधिक मेहनत घ्यावी लागली.

४. या चित्रपटात दाखवण्यात आलेली स्त्रियांची स्थिती आणि स्त्रियांचा तिरस्कार याविषयीचे तुझे मत काय?
‘झी टॉकीज’चा ‘गोल गोल गरा गरा’ हा चित्रपट संपूर्णतः काल्पनिक आहे. खऱ्या आयुष्यात अशा प्रकारची व्यक्ती अस्तित्वात असूच शकत नाही. आजच्या काळातील स्त्रीया सर्वच क्षेत्रात पुरुषांप्रमाणेच आघाडीवर आहेत. आज देशातील अनेक भागांत स्त्रियांना योग्य मान मिळत असलेला आपण पाहतो. या सिनेमातील कलाकार मंडळींना सुद्धा स्त्रियांविषयी नितांत आदर आहे.

५. गिरीश ओक यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याचा अनुभव कसा होता?
गिरीश सरांसोबत याआधी मी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जमवून घेणे सोपे पडले. एकमेकांच्या अभिनयाबद्दल आम्हाला ठाऊक असल्याने, आमच्यातील केमिस्ट्री फार छान जुळून आली.

६. विनोदी चित्रपटात काम करणे अधिक आव्हानात्मक होते का?
या सिनेमाच्या निमित्ताने विनोदी भूमिका साकारण्याची संधी मला मिळाली. ही भूमिका साकारताना खूप मजा आली. वेगळ्या प्रकारची भूमिका करत असल्याने, ते एक आव्हान तर होतंच, पण संपूर्ण टीमच्या मदतीने ते नीट पार पडलेलं आहे.

७. हा टॉकीज ओरिजिनल चित्रपट थेट ‘झी टॉकीज’ वाहिनीवर दाखवण्यात येणार आहे. त्याबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील?
एक जबरदस्त विनोदी सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या कोरोनाचा धोका विचारात घेता, लोक बाहेर गर्दीत जाण्याचे टाळत आहेत. ‘झी टॉकीज’ने एक दर्जेदार सिनेमा घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. एक उत्तम कलाकृती अनुभवण्यासाठी आणि खळखळून हसण्यासाठी, हा चित्रपट नक्कीच हवा.