राधा आणि कृष्णाला जाणून घेण्यासाठी, त्यांच्या प्रेमामध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी नृत्यदर्पण पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांसाठी सादर करत आहे ‘गीतगोविंद’ हे संगीत नृत्य-नाटक. शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता दादरमधील स्वातंञ्यवीर सावरकर सभागृहात सादर होणार आहे. पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या विद्यार्थिनी नृत्य दिग्दर्शिका संध्या दामले यांनी गीत गोविंद या नाट्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे संगीत आणि शंकर महादेवन, अनुराधा पौंडवाल, महालक्ष्मी अय्यर आणि श्रेया घोषाल यांनी त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांनी या नाट्याला चार चाँद लागले आहेत. प्रेक्षकांच्या मागणीमुळे गीत गोविंद पुन्हा रसिक प्रेक्षकांसाठी आयोजित केला आहे. या नृत्य-नाट्यचा आस्वाद घेण्यासाठी जसराज कुटुंब म्हणजे मधुरा जसराज, सारंग जसराज उपस्थित राहणार आहेत. डॉ.बाबसाहेब आंबेडकर या मराठी मालिकेमुळे घरा घरात पोहचलेले, डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या वडिलांची भूमिका करणारे रामोजी म्हणजेच मिलिंद अधिकारी हे सुद्धा प्रमुख अतिथी म्हणू उपस्थित राहणार आहेत.
संध्या दामले या ‘गीतगोविंद’च्या माध्यमातून एक वेगळा विचार आपल्या समोर घेऊन आल्या आहेत. राधा-कृष्णा यांची प्रेमकथा, त्यांच्या नात्यातील वेगवेगळे भाव आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा गीतगोविंदचा उद्देश आहे.राधा-कृष्ण आणि वृंदावनातील गोपिका यांच्यातील नात्याचे वर्णन गीत गोविंद या संगीत-नृत्य-नाटयात करण्यात आले आहे. कृष्णाच्या गोपिकांसोबतच्या रासलीला, ते पाहून राधाला झालेला त्रास, राधाचे रुसणे, गोपिका आणि कृष्णाने राधाचा रुसवा दूर करण्यासाठी केलेले प्रयत्न हे सर्व वेगवेगळ्या अशा १२ गीतांमधून गीत गोविंद या २ तासांच्या संगीत, नाट्य कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे.
या नृत्यनाट्यात नृत्यदिग्दर्शिका संध्या दामले यांनी राधा ही व्यक्तिरेखा अभिनय आणि नृत्याद्वारे साकारणार आहेत. तसेच लोकनृत्यविशारद श्रेयस देसाई यांनी कृष्णाच्या व्यक्तिरेखेमध्ये दिसणार आहेत. अनेक वर्षांपासून आपण राधा-कृष्णाची प्रेमकथा ऐकत आलो आहोत, विविध कलाविष्कारांतून त्याचे सादरीकरणही आपण पाहिले आहे. पण या प्रेमकथेच्या पलिकडे जाऊन राधा- कृष्णाच्या नात्यातील वेगवेगळे भाव आणि प्रसंग हे या नाट्यात दाखवण्यात येणार आहे आणि म्हणूनच गीतगोविंद ही एक वेगळी आणि अनोखी कलाकृती ठरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
अर्चना सोंडे – ८१०८१०५२२९