राधा आणि कृष्णाला जाणून घेण्यासाठी , त्यांच्या प्रेमामध्ये मंत्रमुग्ध होण्यासाठी नृत्यदर्पण घेऊन आलेल्या  ‘गीतगोविंद’ या संगीत नृत्य-नाट्याचा प्रयोग शुक्रवार ११ ऑक्टोबर  रोजी दादर मधील स्वातंञ्यवीर सावरकर सभागृहात सादर झाला. पद्मभूषण डॉ. कनक रेळे यांच्या विद्यार्थिनी नृत्य दिग्दर्शिका संध्या दामले यांनी गीत गोविंद या नाट्याचे  नृत्य दिग्दर्शन केले  आहे. संध्या दामले या ‘गीतगोविंद’च्या माध्यमातून एक वेगळा विचार आपल्या समोर घेऊन आल्या आहेत. राधा-कृष्णा यांची प्रेमकथा, त्यांच्या नात्यातील वेगवेगळे भाव आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा गीतगोविंदचा उद्देश आहे.  या नृत्य-नाट्यचा आस्वाद घेण्यासाठी जेष्ठ चित्रपट समिक्षक/अभ्यासक किरण शांताराम, जसराज कुटुंब म्हणजे मधुरा जसराज, सारंग जसराज उपस्थित होते. अभिनेते मिलिंद अधिकारी आणि प्रदिप वेलणकर यांची देखील मुख्य उपस्थीती होती.

जीवन समृद्ध करणारा ‘गीत गोविंद’ हा कार्यक्रम आहे. या अगोदर मी जसराजजी बरोबर पाहिला होता.आज परत सध्या दामले मुळे पुन्हा पाहणे शक्य झाले आहे. जुण्या आठवणी जाग्या झाल्या. विशेषतः नवीन पिढीने हा आवर्जुन पहावा. कारण नृत्य काय असते, संगित काय असते याचं उत्तम उदाहरण ‘गीत गोविंद’ आहे. असे चित्रपट अभ्यासक किरण शांताराम म्हणाले.

आजच्या पीढीला जुनी संस्कृती, जुनं साहित्य यांची ओळख व्हावी असं वाटत असेल तर प्रत्येकाने गीत गोविंदचा प्रयोग पहावा. असं मधुरा जसराज यांनी म्हटले.

या नृत्यनाट्यात नृत्यदिग्दर्शिका संध्या दामले यांनी राधा ही व्यक्तिरेखा अभिनय आणि नृत्याद्वारे अतिशय उत्तमपणे साकारली आहे. तसेच लोकनृत्यविशारद श्रेयस देसाई यांनी कृष्णाच्या व्यक्तिरेखेला पुरेपूर न्याय दिला आहे. नृत्य आणि चेहऱ्यावरील हावभाव यांद्वारे हे सर्व कलाकार हे नाट्य रसिकांपर्यंत पोहचवण्यात यशस्वी झाले आहेत. अनेक वर्षांपासून आपण राधा-कृष्णाची प्रेमकथा ऐकत आलो आहोत, विविध कलाविष्कारांतून त्याचे सादरीकरणही आपण पाहिले आहे. पण या प्रेमकथेच्या पलिकडे जाऊन राधा- कृष्णाच्या नात्यातील वेगवेगळे भाव आणि प्रसंग हे या नाट्यात दाखवण्यात आले आहेत आणि म्हणूनच गीतगोविंद ही एक वेगळी आणि अनोखी कलाकृती ठरलीये. संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे संगीत आणि शंकर महादेवन, अनुराधा पौंडवाल, महालक्ष्मी अय्यर आणि श्रेया घोषाल यांनी त्यांच्या सुमधुर आवाजातील गाण्यांनी या नाट्याला चार चाँद लागले आहेत. या कार्यक्रमास कृष्णकांत मित्तल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क : अर्चना सोंडे – ८१०८१०५२२९