प्रिय बाप्पा, आज तू आमच्याकडे आलास हे पाहून बरं वाटलं. कसा आहेस तू ? येताना काही त्रास तर नाही ना झाला? कारण आमच्या रस्त्यावरचे खड्डे चुकवताना कायम आमच्या हृदयाचा ठोका चुकत असतो म्हणून म्हटलं. आज आम्हाला चंद्रावर पोहोचणे सोप्पे पण घरी पोहोचणे अवघड झाल आहेे. आणि हो त्या रस्त्यावरच्या बांबूंचा त्रास नाही ना झाला तुला ? थोडीफार ट्रॅफिक जॅम झाली असेल ,पण तू नको मनावर घेऊस कारण आम्ही टॉवर, अपार्टमेंट बांधण्याच्या स्पर्धेत तुला बसवायची जागा कधीच गमावून बसलो आहोत.

त्यामुळे तुला आता रस्त्याच्या बाजूच्या शेडमध्येच समाधान मानावे लागणार आहे .मागच्या वर्षी एक तक्रार होती की, तरुण मुलं आरतीला जमत नाहीत. पण यावेळी मात्र मंडपात जागा पुरणार नाही एवढी तरुणांची संख्या असणार आहे .कारण मंदीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हाताला काम नाही. करोडोंचा टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्या बंद पडल्या तर आपली काय कथा? या विचारांनी या तरुणांना जगण्याचं बळ दिलं आहे. हे एक बरं आहे की, रोज दोन जीबी मिळणारा डाटा त्यांना बेरोजगारीची आठवण होऊ देत नाही. सध्या आम्ही पी. व्ही. सिंधू, हिमा दास या मुलींचे कौतुक तोंड फाटेपर्यंत करतो .पण स्वतःच्या घरी मुलगी जन्माला घालायची तर तेच तोंड लपवत असतो .अश्यांच्या तोंडात एक मारावीशी वाटते .पण मारायची कुणी हा एक प्रश्नच आहे.

कारण निम्मी माणसं मागचं सरकार कसं चुकीचं होतं ,हे सांगण्यात आणि उरलेली माणसे आजचे सरकार कसे हुकूमशहा आहे हे सांगण्यात गुंतलेली आहेत. त्यामुळे त्यांना घसरणारा रुपया, कोसळणारं शेअर मार्केट, भडकणारं तेल या गोष्टीकडे लक्ष द्यायला अजिबात वेळ नाही .पण तू नको त्या गोष्टींकडे लक्ष देऊस, आम्हाला याची सवय झाली आहे .तू आता दहा दिवस चांगला आराम कर, मस्त व्यवस्था केली आहे तुझी. सुंदर लाईटच्या माळा लावल्या आहेत. लाईटच्या माळा वरून आठवलं ,या सर्व चायनाच्या माळा आहेत बरं आणि विशेष म्हणजे जे चायनाच्या वस्तू वर बहिष्कार टाका म्हणत होते ना, त्यांनीच खरेदी करून आणल्या आहेत..

असो तू आला आहेस तर नक्की आमच्या डोक्यात प्रकाश पाडण्याचं काम करशील, अशी खात्री आम्हा भक्तांना नक्कीच आहे .आता तू म्हणशील सगळं मीच करायचं तर तुम्ही काय करणार ? तू म्हणतोस तेही खर आहे म्हणा, पण कान धरून सांगणारं कुणी असेल तर चुका कमी होतात असे लहानपणी आई सांगायची .तेव्हा तू आता धरशील ना सर्वांचे कान ?

तुझाच भक्त किरण बेरड
सीईओ वर्ड बँक

(किरण बेरड हे चित्रपट कथा लेखक असून लिखाण पुरविणाऱ्या वर्ड बँक या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत.)

लेखक चित्रपट कथा लेखक असून लिखाण पुरवणार्‍या वर्ड बँक या कंपनीचे संस्थापक अध्यक्ष आहेत