&’ असा भेटला ‘जरा हटके’ चा इंद्रनील
Found That Indranil SenGupta
इरॉस इंटरनॅशनलच्या क्रीशिका लुल्ला,रवी जाधव निर्मित आणि प्रकाश कुंटे दिग्दर्शित ‘& जरा हटके’ या चित्रपटात लवकरच आपल्याला काहीतरी हटके पाहायला मिळणार आहे. बरं आता ते हटके काय असेल ? तर ती हटके गोष्ट अशी आहे की या मध्ये आपल्याला मराठी सोबत बंगाली भाषेची गोडी सुद्धा अनुभवता येणार आहे, आणि हे पात्र रंगवणार आहेत ते हिंदी सिनेमासृष्टी मधील ‘इंद्रनील सेनगुप्ता’. पहिल्यांदाच ‘& जरा हटके ‘ च्या निमित्ताने ‘इंद्रनील सेनगुप्ता मराठीमध्ये पदार्पण करत असून या चित्रपटामध्ये त्यांची भूमिका सुद्धा तशी हटकेच आहे.
मिताली जोशी लिखित या हटके सिनेमाची कथा सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कुंटे यांनी निर्माते रवी जाधव यांच्यासमोर मांडली असता, रवीने कथा ऐकताच क्षणी पसंती दर्शवली. नेहमीच नावीन्यतेचा ध्यास बाळगणाऱ्या रवी जाधवच्या शैलीनुसार ‘& जरा हटके’ ची कथा’ असल्यामुळे त्यांना ती खूप वेगळी आणि भन्नाट वाटली. आजच्या आधुनिक युगात नात्यांमध्ये घडत जाणाऱ्या बदलांची आणि वास्तवाची जाणीव करून देणारा संवेदनशील विषय आहे असे त्यांना वाटले, त्यामुळे हा विषय प्रेक्षकांसमोर घेऊन येताना त्यात थोडा मसाला टाकण्यासाठी रवी जाधव यांच्या संकल्पनेतून बंगाली पात्राची संकल्पना पुढे आली. बरं पण हे बंगाली पात्र कोणीतरी बंगाली कलाकाराने केले पाहिजे असा रवी जाधव यांचा अट्टहास होता मग त्याचप्रमाणे शोध सुरू झाला. अशावेळी, हिंदी मालिकेतून तसेच काही सिनेमांतून लोकांसमोर आलेला बंगाली बाबू इंद्रनील सेनगुप्ताची या भूमिकेसाठी निवड करण्यात आली. इंद्रनीलने देखील या भूमिकेला योग्य न्याय देत या सिनेमात जान ओतली.
इरॉस इंटरनेशनलच्या क्रिशिका लुल्ला यांनीदेखील रवीला दुजोरा देत सिनेमाची गरज ओळखून बंगाली पात्रासाठी लगेच सहमती दर्शवली. इंद्रनीलला मराठीतील त्याच्या या हटके भूमिकेविषयी विचारले असता तो म्हणाला, ‘मराठी चित्रपटात काम करताना मज्जा आली. मराठीतील मोठ्या आणि नामवंत कलाकारांसोबत काम करण्याचा खूप छान अनुभव मला मिळाला’. शिवाय यापुढे देखील मराठीत काम करायला आवडेल अशी इच्छा देखील ‘& जरा हटके’ या सिनेमाच्या ट्रेलर लाँन्च मध्ये त्याने बोलून दाखवली.
आता इंद्रनीलचा हा हटके अंदाज कसा असेल आणि प्रेक्षकांना तो किती भावतोय हे येत्या २२ जुलैला आपल्याला कळेलच.