Interview – स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन हवं – शरद पोंक्षे

स्त्रीभ्रुण हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन हवं – शरद पोंक्षे 

मराठीतला पहिला हॉररपट ‘कनिका’ 31 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्येष्ठ अभिनेता शरद पोंक्षे यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. या  निमित्ताने पोंक्षे यांच्याशी केलेली बातचित…

आतापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांतून काम केलं. या चित्रपटाचं वेगळेपण काय सांगाल?

– आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीतल्या चित्रपटांमध्ये ‘कनिका’ नक्कीच वेगळा चित्रपट ठरला आहे.
मराठीतला पहिला हॉररपट हे ‘कनिका’चं वेगळेपण सांगता येईल. केवळ हॉररपट एवढ्यापुरतंच या चित्रपटाचं वेगळेपण मर्यादित नाही, तर अत्यंत परखड, जबरदस्त असं सामाजिक भाष्य हा चित्रपट करतो.

चित्रपटातील तुमच्या भूमिकेविषयी काय सांगाल ?

– या चित्रपटात माझी डॉक्टरची भूमिका आहे. ही कनिका डॉक्टरच्या आयुष्यात कशी येते आणि डॉक्टरचं जगणं बदलून जातं. अत्यंत थरारक असा अनुभव या चित्रपटातून मिळणार आहे. सामाजिक भाष्य असलं, तरी ते प्रचारकी आव आणून केलं नाही.

स्त्री भ्रूण हत्या या विषयावर आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून जागृती करून झाली. तरीही अनेक घटना घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर हा चित्रपट कसा वेगळा ठरेल?

– स्त्री भ्रूण हत्या हे घृणास्पद कृत्य आहे. हे कृत्य करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन व्हायला हवं. मात्र, आपल्याकडे पैशाने सगळंच विकत घेता येतं असं चित्र आहे. अनेक घटना घडतात आणि त्यातले दोषी मोकाट सुटतात. त्यामुळे न्याय व्यवस्था आहे की नाही असं वाटू लागतं. एखादी आई मुलाला ऐकत नाही म्हणून भीती दाखवते आणि मुल शांत होतं. तसंच या चित्रपटातून समाजाला भीती दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. हा चित्रपट पाहून स्त्री भ्रूण हत्या करणारा एखादा माणूस थांबला, तरी शंभर कोटींचा व्यवसाय केल्याइतकं यश मिळालं असं मी मानतो.

प्रथमच दिग्दर्शन केलेल्या पुष्कर मनोहर यांच्यासह काम करण्याचा अनुभव कसा होता?

– दिग्दर्शक पुष्कर मनोहर यांच्यासह काम करताना खूप मजा आली. त्यांना नेमकं माहीत होतं आपल्याला चित्रपटातून काय सांगायचं आहे. त्याची त्यांनी पूर्वतयारी केली होती. चित्रपटाच्या उच्च निर्मिती मुल्यांसाठी त्यांनी काहीही कसूर केलेली नाही. काहीवेळा अडचणींचा सामना करावा लागला. त्याबद्दल सांगायचं झालं, तर मे महिन्यात आम्ही शूटिंग करत होतो आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. काहीही काम करता येत नव्हतं. रात्रभर आम्हाला बसून रहावं लागलं. पुष्कर यांनी अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळली आणि राहिलेलं काम पूर्ण केलं. त्यांनी अतिशय विचारपूर्वक हा चित्रपट साकारला आहे. डॉल्बी साऊंड, सिनेमास्कोप अशा उत्तम तंत्रज्ञानाचा वापर चित्रपटासाठी केला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हॉरर अनुभव चित्रपटगृहात जाऊनच घ्यावा.