तंबाखूसेवन कर्करोगाचे कारण आहे तंबाखूच्या पॅकेट्सवर, जाहिराती अगदी प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला देखील आपण हे पाहतो, वाचतो. दुर्दैवाने तंबाखूसेवन, मद्यपान, धूम्रपान ह्यांना आजकाल एक सामाजिक स्टेटस प्राप्त झालं आहे. त्यामुळे कित्येक तरुण मुलं-मुली ह्यांच्या आहारी जातात. आणि त्यातून अनेक समस्या उद्भवतात.

तंबाखू, सिगरेट्स आणि त्याच्या समस्या म्हणलं की आधी डोळ्यांसमोर येतो तो त्यामुळे होणारा तोंडाचा कर्करोग किंवा लंग कॅन्सर. खरंच तंबाखूमुळे कॅन्सर होतो का? जाणून घेऊया ह्या लेखातून. नक्की कसा होतो तंबाखूमुळे कॅन्सर

तंबाखूमध्ये आढळणारी कमीतकमी 70 रसायने ही कारसिनोजनीक म्हणजेच कॅन्सरसाठी कारणीभूत असतात. त्यात प्रामुख्याने निकोटिन, टार, फॉर्मलडिहाईड ह्यांसारखी रसायनं असतात. टार आणि फॉर्मलडिहाईड हे शरीरातील पेशींना छिद्र पाडतात आणि DNA (ज्यापासून सजीव बनतात) ह्यांना नुकसान पोहोचवतात.

मानवी शरीरात जर शरीराबाहेरील एखादा हानिकारक घटक शरीरात गेला तर शरीरातील पेशी काही प्रमाणात वाढतात आणि त्यांचा आकार वाढवून त्या घटकाला त्यांच्यात सामावून घेऊन नष्ट करतात. ह्या प्रक्रियेला इंफ्लामेश असे म्हणतात. जेव्हा व्यक्ती धूम्रपान करते किंवा तंबाखू सेवन करते तेव्हा ही प्रक्रिया

सतत होते. ह्यामुळे फुफ्फुसातील पेशींवर ताण येतो आणि त्या अगणिक रित्या वाढतात. त्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग अर्थात लंग कॅन्सर होतो. ह्याशिवाय म्युटेशन हेसुद्धा एक कारण आहे. आपल्या शरीरात प्रत्येक गोष्टीसाठी एक जीन असते. हे जीन शरीरातील प्रत्येक घटना ठरवतात अगदी आपली वागणुक देखील. फुफ्फुसातदेखील त्यांचे कार्य सुरळीत होण्यासाठी असे अनेक जीन्स असतात.

त्यातील KRAS ह्या जीन वर अचानक न बदलता येणाऱ्या बदलामुळे (म्युटेशन) देखील लंग कॅन्सर होतो. ह्या म्युटेशनसाठी तंबाखूची रसायने कारणीभूत ठरतात. तंबाखूमुळे होणारे कर्करोग : तंबाखूमुळे फक्त तोंडाचा किंवा फुफ्फुसाचाच कर्करोग होती असे नाही. ह्यामुळे यकृत, रक्त, अन्ननलिका ह्यांचे कर्करोगदेखील होऊ शकतात.

कोणाला होतो कर्करोग? तंबाखू किंवा धूम्रपान करणाऱ्या माणसालाच कर्करोग होतो असे नाही. धूम्रपान करणाऱ्या माणसाच्या सतत आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तीला ही हा धूर शरीरात गेल्याने कर्करोग होऊ शकतो. ह्याला पॅसिव्ह स्मोकिंग असे म्हणतात. उपाय ह्या गोष्टी टाळायच्या असतील तर ह्यावर एकमेव उपाय आहे तंबाखूसेवन, धूम्रपान,
मद्यपान कायमचे बंद करणे.

ह्या गोष्टींच्या सेवनाने क्षणाचे सुख मिळते पण शरीराची कधीही भरून न निघणारी हानी होते. तेव्हा वेळीच स्वतःला ह्या साऱ्या मोहतून सावरा आणि आपल्या अमूल्य अशा शरीराची काळजी घ्या.

Credit : भक्ती संदिप