युनेस्कोच्या नेतृत्वातील ग्लोबल अलायन्स फॉर पार्टनरशिप ऑन मीडिया अ‍ॅन्ड इन्फॉरमेशन लिटरसी (GAPMIL) कडून जगातील विविध भागांत युनेस्कोच्या माध्यम आणि माहिती साक्षरतेसाठीच्या जागतिक कृती आराखड्यावर काम करण्यासाठी जगभरातून बारा युवादूतांची नावे जाहीर केली आहेत. जगभरातून आलेल्या सहाशेपेक्षा अधिक अर्ज आणि प्रस्तावांमधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागातील पीएचडीचे विद्यार्थी श्री. धम्मरत्न श्रीराम जावळे यांची या १२ युवादूतांमध्ये आशिया-पॅसिफिक प्रदेशासाठी UNESCO-GAPMILचे जागतिक युवादूत म्हणून निवड झाली आहे.

धम्मरत्न जावळे हे विद्यापीठाच्या माध्यम आणि संज्ञापन अभ्यास विभागातील एम.एस्सी. अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. सदध्या ते विभागप्रमुख डॉ. माधवी रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यूजीसीच्या कनिष्ठ संशोधन अधिछात्रवृत्ती (एमएचआरडी, भारत सरकार) अंतर्गत पीएचडी संशोधक म्हणून काम करत आहेत.

त्यांची आशिया-पॅसिफिकमधील तीन अन्य युवादूतांसोबत निवड झाली असून त्यांच्यासोबत आफ्रिका, अरब राज्ये, युरोप, उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका आणि कॅरिबियन देशांतील अन्य युवादूतांचाही समावेश आहे. सर्व युवादूत GAPMIL च्या जागतिक युवक समितीचे २०१९-२०२१ या कालावधीसाठी सदस्य म्हणून आपापल्या विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

सन २०१३ मध्ये अबूजा (नायजेरिया) याठिकाणी झालेल्या ग्लोबल पार्टनरशिप फोरम दरम्यान सुरू करण्यात आलेला GAPMIL हा एक आंतरराष्ट्रीय सहकार कार्यक्रम आहे ज्याद्वारे जगातील सर्व नागरिकांमध्ये माध्यम आणि माहिती साक्षरतेसाठीची सजगता वाढावी आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना देण्याचा यूनेस्कोचा प्रयत्न आहे.

GAPMIL हा कार्यक्रम माध्यम आणि माहिती साक्षरतेच्या विकास आणि परिणामाला जागतिक स्तरावर चालना देण्याच्या दृष्टीने खंबीर भागीदारी कार्यरत करण्यासाठी समर्पित आहे, तसेच यासंदर्भातील धोरण, शिक्षण आणि तंत्रज्ञान यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर सक्षम नेतृत्व उभे करणे हाही हेतु आहे.

GAPMILचे युवादूत युवकांमध्ये माध्यमातील माहिती साक्षरतेसाठी जागरूकता वाढविण्यासाठी आणि युवा प्रशिक्षणात योगदान देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रातील परिचालक भागीदार आणि भागधारकांच्या सहकार्याने ही उद्दीष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करतील.

सर्व युवादूत नागरिकांमध्ये यासंदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी GAPMIL-युवक समिती, GAPMIL-आंतरराष्ट्रीय सुकाणू समिती, GAPMIL-क्षेत्रीय अध्याय आणि उप-अध्यायांना विधायक पाठिंबा देतात.

GAPMILमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि गटांचा समावेश आहे ज्यात संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संस्था (UNESCO: पॅरिस, फ्रान्स); संयुक्त राष्ट्रांची नागरिक सहयोग संस्था (UNAOC: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स); स्वीडिश आंतरराष्ट्रीय विकास सहकार एजन्सी (SIDA: स्टॉकहोम, स्वीडन); युरोपियन आयोग (EU: ब्रुसेल्स, बेल्जियम); संयुक्त राष्ट्रांची बाल-निधी संस्था (UNICEF: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स); आंतरराष्ट्रीय संशोधन आणि विनिमय बोर्ड (IREX: वॉशिंग्टन डीसी, युनायटेड स्टेट्स); मुक्त समाज संस्था (OSF: न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स) तसेच यूरोपियन राष्ट्रांतील इतर काही एजन्सी आणि आंतरराष्ट्रीय विकास भागीदार यांचा समावेश आहे.