दिवाळी म्हणजे दिव्यांच्या, रोशणाईचा सण, परिवार आणि मित्रमंडळी यांना भेटून, एकत्र बसून फराळावर ताव मारण्याचा सण.

या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ले. अंगणातील किल्लाही दिवाळी सणाचा अविभाज्य घटक आहे. मोठ्यांच्या मदतीने अंगणात बच्चेकंपनींची मातीच्या किल्ला बनवण्याची लगबग हे चित्र आज लोप पावत चाललं आहे.

महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगात महत्त्व कमी होताना दिसतंय.

झी युवा वरील डॉक्टर डॉन मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता देवदत्त नागे यांनी आपल्या घराच्या अंगणात साकारलेली महाराजांच्या किल्ल्याची मातीची प्रतिकृती सोशल मिडीयावरुन चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

डॉक्टर डॉन मालिकेतून देवा म्हणून अभिनेता देवदत्त नागे महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत किल्ल्याच्या मातीच्या प्रतिकृतीचे फोटो शेअर केले. देवदत्त हे मूळचे निसर्गरम्य अलिबागचे आहेत.

त्यांनी आपल्या घराच्या अंगणात हा सुरेख किल्ला साकारला, सोबतच त्यांनी एक खंतसुध्दा व्यक्त केली. किल्ल्यांपेक्षा हॅलोविनचे फोटोज जास्त बघायला मिळत असल्याची खंत देवाने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

देवदत्त नागे यांच्या या किल्ल्याच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स व कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे.