योग फक्त तुमच्या शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही कसा परिणामकारक ठरतो, याची ‘सक्सेस स्टोरी’ आहे अभिनेत्री दिप्ती देवी. अभिनेत्री दिप्ती देवी गेली तीन वर्ष अष्टांग योगा ट्रेनर रीमा वेंगुर्लेकरकडे जाऊन योगाभ्यास करतेय. योगामूळे तिने आपल्या अनेक आरोग्यविषयक समस्यांवर मात केल्याचं तिने नुकतंच 21 जूनला साज-या होणा-या, आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने मनोगत व्यक्त करताना म्हटलं आहे.

अभिनेत्री दिप्ती देवी सांगते, ” तीन वर्षापूर्वी मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या चांगल्या स्थितीत नव्हते. पॅनिक अटॅक्स, चिंंता, नैराश्यग्रस्त मनस्थितीचा माझ्या शारीरिक आरोग्यावरही परिणाम झाला होता. पण मी रीमाला भेटल्यावर तिने योगाभ्यासाव्दारे माझ्यात शारीरिक-मानसिकदृष्ट्या खूप सकारात्मक बदल घडवून आणले. माझी पचनशक्ती वाढण्यापासून, ते माझी चेह-याची कांती सुधारणे आणि माझी एकाग्रता वाढण्यापर्यंत माझ्यात झालेल्या बदलांचे श्रेय रीमाला जाते. तिने जणू मला जगण्याची एक नवी दिशा दिली आहे.”

https://www.instagram.com/p/CBkMe2RpQXj/?utm_source=ig_web_copy_link

अभिनेत्री दिप्तीच्या ट्रेनिंगबाबत योगा ट्रेनर रीमा वेंगुर्लेकर सांगते, “दिप्तीचा योगा क्लासमधला पहिला दिवस मला आजही आठवतोय. तिथपासून आजपर्यंतचा तिचा योगाभ्यातला प्रवास सोप्पा नव्हता. आरोग्यविषयक तक्रारींशिवाय तिच्या शरीरात लवचिकता अजिबात नव्हती. पण तिने स्वत:वर मेहनत घेतली. त्यामूळे सकारात्मक बदलांकडे आपोआपच तिची वाटचाल सुरू झाली. खरं तर तीन महिन्यांच्या कालावधीतच तिच्यातले बदल हळूहळू दिसू लागले होते. प्रत्येकाच्याच आयुष्यात एक ‘बॅड फेज’ किंवा ‘लो फेज’ येते. पण त्यावर मात करून तुम्ही सशक्तपणे कसे उभे राहू शकता, हे नियमीत योगाभ्यास करून दिप्तीने दाखवलंय. ती माझी विद्यार्थीने असल्याचा मला अभिमान आहे.”