मित्रांनो!, बॉलीवूड फिल्म इंडस्त्री हे जर साम्राज्य असेल तर शतकातील महानायक अमिताभ बच्चन हे या समस्त साम्राज्याचे अनभिषिक्त सम्राट आहेत, यावर बहुतेकांचे एकमत होईल. आजही जगभर अमिताभ बच्चन यांचे चाहते आहेत. अगदी त्यांना देवाचा दर्जा देऊन, त्यांचे मंदिर बांधून, त्यांची रीतसर आरती, पूजा, अर्चना करणारे लोकही आहेत. तर हा अनोखा किस्सा आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु याच गोष्टीला एक दुसरी आणि तितकीच महत्वाची आणि अनोखी दुसरी बाजू आहे याची मात्र आपल्यापैकी बहुतेकांना कल्पना नाही. चला तर मग आज ती दुसरी बाजूही जाणून घेऊ…

अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुली’ हा चित्रपट त्यांचा कोणताही चाहता विसरणं शक्य नाही. २६ जुलै १९८२ मध्ये चित्रपटाच्या सेटवर अभिनेता पुनीत इस्सरचा ठोसा चुकवण्याचा प्रयत्न करताना बिग बींच्या पोटाला टेबलाचा कोपरा लागला होता. विशेष म्हणजे या अपघातातून बिग बी थोडक्यात बचावले आहेत. त्यामुळे कुली चित्रपटाचा उल्लेख केल्यावर अनेकांना त्या अपघाताची आठवण होते.

परंतु, या अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या पुनीत इस्सर यांच्याच पत्नीमुळे बिग बींचे प्राण वाचले होते हे फार कमी जणांना ठावूक आहे. बिग बींचा अपघात झाल्यानंतर अनेकांनी त्याचा दोष पुनीत इस्सर यांना दिला होता. अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली होती. मात्र…

याच पुनीत इस्सर यांच्या पत्नीने योग्यवेळी रक्तदान केल्यामुळे बिग बींचे प्राण वाचू शकले. हे सुद्धा तितकेच खरे आहे. सेटवर झालेल्या अपघातामुळे अमिताभ बच्चन यांचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला होता. त्यामुळे उपचारादरम्यान त्यांना रक्ताची कमतरता निर्माण झाली होती. मात्र, यावेळी क्षणाचाही विलंब न करता पुनीत इस्सरच्या पत्नीने अमिताभ यांना रक्तदान केलं होतं.

या अपघातामध्ये पुनीत यांचा काहीही दोष नाही किंवा, त्यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही असं बिग बींनी सांगण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यापूर्वीच पुनीत यांना या प्रकरणाची शिक्षा मिळाली होती. एकाच वेळी त्यांच्या हातून ८ चित्रपट गेले होते. त्यामुळे त्यांना बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम करावं लागलं होतं. इतकंच नाही तर बिग बींच्या चाहत्यांनी त्यांना हेट लटर्सही पाठवले होते.

दरम्यान, अमिताभ बच्चन रुग्णालयात अॅडमीट असताना पुनीत इस्सर त्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी पश्चाताप झाल्यामुळे त्यांनी बिग बींची माफी मागितली होती. मात्र, बिग बींनी या प्रकरणी पुनीतची कोणतीही चूक नसल्याचं म्हटलं होतं. तसंच एका चित्रपटात माझ्या चुकीमुळे विनोद खन्ना जखमी झाले होते. आजही त्यांच्या कपाळावर ८ टाके आहेत, त्यामुळे अशा चुका होतच राहतात, असं म्हणत बिग बींनी पुनीत इस्सर यांना माफ केलं होतं.