Bhikari Marathi Movie Review
- Movie : Bhikari (2017) | भिकारी
- Producer : Sharad Devram Shelar, Ganesh Acharya
- Director : Ganesh Acharya
- Star Cast : Swwapnil Joshi
Rucha Inamdar
Guru Thakur
Sayaji Shinde
Milind Shinde
Kirti Adarkar
Sunil Pal
गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांनी आपली ओळख जागतिक स्तरावर निर्माण केली आहे. मराठीत सिनेमाच्या कथेची मांडणी सकारात्मक झाली तर प्रेक्षकसुद्धा सिनेमा आवर्जून पाहतात. कथा, स्टारकास्ट, त्याची मांडणी ही सिनेमांची खरी ताकद असते. स्वप्निल जोशी स्टारर आणि बॉलिवूडचे मास्टरजी गणेश आचार्य यांनी दिग्दर्शित केलेला स्वामी तिन्ही जगाचा Bhikari ‘भिकारी’ हा सिनेमा या आठवड्यात प्रदर्शित झाला आहे.
ही कथा आहे एका श्रीमंत मुलाची म्हणजे सम्राट जयकरची (स्वप्निल जोशी). लंडनमधून भारतात परतलेला सम्राट कौटुंबिक व्यवसायाकडे हातभार घालतो. लहानपणापासून वाढवलेला हा व्यवसाय आता सम्राट पाहतो. काम करत असलेल्या कामगारांना नवीन मुभा, सूट तसेच मिलमध्ये नवीन मशिन वगैरे आणून तो तिकडे रमून जातो. अचानक त्याच्या आईवर एक प्रसंग ओढवतो आणि ती कोमात जाते. आई कोमात गेल्यावर सम्राट खूप खचून जातो. दिवस रात्र आई आई करत फिरणारा सम्राट कुठेतरी डगमगून जातो. सगळं काही असताना देखील तो आईला विचवू शकेल की नाही याची भिती त्याला वाटते, तरी तो परीने प्रयत्न करतच असतो. देवाकडे कधी न हात जोडणारा मुलगा आईसाठी ते सुद्धा करू पाहतो. त्यावेळी तेथील गुरूजी त्याला आईसाठी भिक्षा माग म्हणून सांगतात. आणि त्यानंतर या श्रीमंत घराण्यातील तरूण पुण्यातील विठ्ठल मंदिराबाहेर बसणा-या भिका-यांच्या टोळीमध्ये सामील होऊन भिक मागायला सुरूवात करतो.
आईसाठी काही मागे पुढे न पाहता तो ४८ दिवस भिकारी म्हणून जगू लागतो. त्या ४८ दिवसात त्याने कोणकोणत्या संकटावर मात केलं आणि एक एक दिवस कसा जगला हे यातून मांडण्यात आलं आहे. त्याच दरम्यान एक पिझ्झा शॉप चालवणारी मधू (रूचा इनामदार) हिच्या तो प्रेमात पडताना दाखवला आहे. बरं मधूला सम्राट भिकारी आहे हे माहीत नसतं. भिका-याचं आयुष्य किती हालाकीचं असतं हे सम्राटला खूप चांगल्या पद्धतीने उमगलं होतं. आईसाठी भिक्षा मागणा-या सम्राटला त्याचं फळ मिळतं का? आई कोमातून बाहेर येते का? मधूला सम्राट कोण आहे ते समजतं का? या सगळ्यांच्या उत्तरासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.
सिनेमात एकूण १० गाणी आहे. प्रत्येक गाणं हे त्या त्या परिस्थितीतीला अनुसरून असल्याने सिनेमा पाहताना थोडं हळवं व्हायला होतं. आईसाठी देवाला आर्त हाक मारणाऱ्या सम्राटवर मागू कसा हे चित्रित केलेलं गाण्यातून स्वप्नीलचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आईसाठी सर्व काही सोडून, रस्त्यावर आलेल्या मातृभक्त मुलाचे हे गाणे पाहताना डोळ्यात अश्रू आणतात इतकं भावनिक आणि हृदयस्पर्शी झालं आहे. संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडीमध्ये गणल्या जाणा-या अजय-अतुलमधील अजय गोगावलेचा या गाण्याला आवाज लाभला आहे. प्रसिद्ध गीतलेखक गुरु ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला विशाल मिश्रा यांनी संगीत दिले आहे. तसेच बाळा या गाण्यातून स्वप्निलने हिप-हॉप सुद्धा केला आहे. साऊथची कॉपी असल्यामुळे सिनेमात गाण्यांची गर्दी आहे. त्यांची लोकेशन्स आणि टेक्निक ब-यापैकी चांगली आहे.
स्वप्नील जोशी बरोबर या सिनेमामध्ये रुचा इनामदार, कीर्ती आडारकर, गुरु ठाकूर, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे आणि प्रदीप काबरा ह्या कलाकारांची देखील विशेष भूमिका आहे. विशेष म्हणजे या सिनेमातून स्वप्निलने घेतलेली या सिनेमासाठीची मेहनत खरच पाहण्यासारखी आहे. या सिनेमाची कथा शशी यांची असून पटकथा, संवाद आणि गीत गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. स्टारकास्ट तगडी असली तरी कुठे तरी प्रमोशन मध्ये कमी पडल्याचं जाणवत आहे. सिनेमाला प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्याची प्रचंड क्षमता आहे परंतु तसं घडायला कुठेतरी प्रमोशन आणि मार्केटिंग कमी पडल्याचे जाणवते.