प्रेक्षकांची लाडकी ‘झी युवा’ वाहिनी, दर्जेदार मालिका आणि कथाबाह्य कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांसाठी नेहमीच घेऊन येत असते. कार्यक्रमांचे वेगळेपण, ही वाहिनीची खासियत आहे. कार्यक्रमाचे स्पर्धात्मक स्वरूप बाजूला सारून, संगीत आणि गप्पा यांचा संगम असणारी ‘मेहफिल’ या वाहिनीवर सध्या पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्यात सुरु झालेला हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला आहे. क्रांती रेडकर हिचे खुमासदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे. विविध कलाकारांची उपस्थिती त्यांनी संगीताबद्दल मारलेल्या गप्पा आणि सादर केलेली कला यामुळे कार्यक्रमाची रंगात अधिक वाढते. प्रत्येक भागात संगीतक्षेत्रातील एका उत्तम कलाकाराचा प्रवास अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना ‘मेहफिल’मधून मिळते.
सर्वांची लाडकी गायिका बेला शेंडे हिची मेहफिलमधील उपस्थिती प्रार्थनीय ठरली. रोमँटिक थीमवर आधारित असलेल्या या भागात, पाहुणा कलाकार म्हणून बेला शेंडे हा सर्वोत्तम पर्याय होता. तिच्या गोड आवाजातील गाण्याने तिने प्रेक्षकांवर उत्तम मोहिनी घातली. बेलाच्या बरोबरीने राहुल सक्सेना , जुईली जोगळेकर, सावनी रवींद्र हे गायक सुद्धा उपस्थित होते. सुंदर गाण्यांच्या सादरीकरणाने या गायकांनी सुद्धा प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. सगळ्या तरुण गायकांची रोमँटिक गाणी ऐकताना प्रेक्षकवर्ग खूपच खुश झालेला होता. वयाची वीस वर्षे संगीत क्षेत्रात काम करणाऱ्या बेला शेंडे हिच्या अनेक आठवणी ‘मेहफिल’च्या निमित्ताने ताज्या झाल्या. या आठवणी शेअर करत असताना ती म्हणाली;
“२० वर्षांच्या या प्रवासात अनेक आठवणी गोळा केलेल्या आहेत. संगीतक्षेत्रातील दैवत असलेल्या ए. आर. रेहमान यांच्यासह काम करण्याची मला संधी मिळाली, हे माझे खूप मोठे भाग्य आहे. रेहमान सरांसोबत रेकॉर्डिंग करण्याची पहिली संधी मला मिळाली, ती ‘जोधा अकबर’ सिनेमातील ‘मन मोहना’ या गाण्यासाठी. मराठी संगीतविश्वात अनेक मोठे कलाकार आहेत. माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच माझ्यावर अनेकांनी विश्वास टाकला. त्यांनी त्यावेळी संधी दिली, म्हणूनच आज मी इथवर पोचू शकले आहे. विविध प्रकारची गाणी गाण्याची संधी मला सुरुवातीपासूनच मिळाली आहे. ही संधी मला उपलब्ध करून देणाऱ्यांची मी कायम ऋणी राहीन.”