ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आज ११ ऑक्टोबरला ७८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. बच्चन साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे हजारो फॅन्स त्यांच्या घराबाहेर जमतात. त्यांची एक झलक पाहण्यासाठी ते तासन् तास घराबाहेर वाट बघत असतात. काही महिन्यांपूर्वीच कोरोनावर मात करुन अमिताभ बच्चन परतले आहेत. अशा परिस्थितीत बच्चन साहेब त्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार नाहीत. या त्यांच्या वाढदिवशी आमच्या रसिक वाचकांसाठी बच्चन साहेबांचा हा फारसा कुणाला माहीत नसलेला गंमतीदार किस्सा. तर त्याचे झाले असे की…

आज जरी अमिताभ बच्चन यांना शतकातील महानायक आणि फिल्म इंडस्ट्रीचा शहेनशहा म्हणून ओळखले जात असले तरी पण एक काळ असाही होता की, त्यांना एकाही चित्रपटात घेण्यास कुणीही तयार नव्हते. आज अमिताभ जे कोणी आहेत, त्यामागे एका बाप माणसाचा हात आहे. एक असा बापमाणूस की जो चित्रपटात असला तर भल्याभल्या हिरो लोकांना कॉम्प्लेक्स यायचा की, सगळा पिक्चर हाच खाऊन जाणार म्हणून. हा माणूस म्हणजे दिग्गज विनोदी अभिनेते मेहमूद. अमिताभ यांच्या कारकिर्दीत आणि यशात मेहमूदचा मोठाच रोल आहे.

मेहमूद यांच्या ‘बॉम्बे तो गोवा’ या चित्रपटामुळेच अमिताभ यांना ओळख मिळाली. १९६९ साली अमिताभ इंडस्ट्रीत स्ट्रगल करत असताना मेहमूद यांनीच त्यांना ‘बॉम्बे टू गोवा’ या चित्रपटात में रोल करण्याची संधी दिली होती. आजचा बिग बीं च्या वाढदिवशी याच ‘बॉम्बे टू गोवा’च्या लोकेशन वरचा हा गंमतीदार किस्सा… ‘बॉम्बे टू गोवा’चे चित्रीकरण सुरु होते. मुळात हा चित्रपट मेहमूद यांनी अमिताभ व मेहमूदचा भाऊ अनवर अली यांना लॉन्च करण्यासाठी बनवला होता. चित्रीकरण एकदम झकास चालले होते. प्रसंग होता ‘देखा ना हाय रे सोचा ना’. हे गाणे शूट करण्याचा…

बच्चन सेटवर आल्यावर मेहमूद म्हणाला की, ‘अमित, देख अभी ये गाणे का शूट है. मैं चाहता हूँ के इस गाने में तेरा एक फर्स्ट क्लास डान्स हो.’ झालं… अमिताभ गे ऐकून इतके घाबरले की, त्यांना दरदरून घामच फुटला. चित्रीकरण सुरु झाले आणि बच्चनजी नाचू लागले. पण एकही पाऊल काही ठेक्यावर पडेना. रिटेक मागून रिटेक झाले.

मुळीच डान्स न येणाऱ्या बच्चन यांचा डान्स पाहून सगळ्यांची चांगलीच करमणूक होत होती. सेटवरचे सगळे आपल्यावर हसत आहेत, असे पाहून बच्चन शरमेने लाल झाले आणि थेट त्यांच्या रूममध्ये जाऊन बसले. मेहमूदसह सगळे त्यांना शोधू लागलेत. शेवटी ते रूममध्ये असल्याचे कळल्यावर मेहमुदने काही वेळ वाट पाहिली, पण हे महाराज काही रूमबाहेर येईनात. झालं… जरा वेळानं मेहमूदची सटकली, ते स्वत: रूममध्ये गेले.

पाहतात काय तर अमितजी पलंगावर आडवे झाले होते. अंगात १०२ डिग्री ताप भरलेला. पण अशा अवस्थेतही मेहमूदला चिडलेला पाहून बच्चनजी थरथर कापू लागले. मेहमूद आपल्याला डान्स करायलाच लावणार या विचाराने त्यांना इतकं टेन्शन आलं की, ते मेहमूद यांच्यासमोर ढसाढसा रडू लागले. त्यांनी थेट मेहमूद यांचे पाय पकडले अन म्हणाले, “भाईजान, मुझे नाचना नहीं आता, ये डान्स वान्स मुझसे नही होगा’ असे म्हणत पायही सोडायला तयार होईनात. पण मेहमूदला जराही पाझर फुटला नाही.

‘देख अमित, जो चल सकता है, वो डान्स भी कर सकता है ‘ असे त्यांनी बजावले.पण बच्चन नाचायला तयार होईनात. अखेर तुला नाचता येते तसे नाच, आपण तसेच शूट करू, असे म्हणून ते रूमबाहेर पडले. बाहेर सेटवर त्यांनी आपल्या टीमला तशा सूचनाही दिल्या. अमित नाचतो, तसे नाचू द्या. कोणीही हसणार नाही. उलट टाळ्या वाजवून चिअर करा.

असा टीमला दम दिला. १०२ डिग्री ताप असताना अमितजी अखेर कॅमे-यासमोर डान्स करण्यासाठी उभे झाले. त्यांचा तो डान्स पाहून युनिटला हसू आवरेना. पण कंट्रोल करत, मेहमूद यांनी सांगितल्याप्रमाणे टाळ्या वाजवून चिअर करणे सुरु केले. हा उत्साह बघून अमिताभचा उत्साह सुद्धा वाढला आणि यानंतर त्यांनी असा काही डान्स केला की, हे गाणे तुफान सुपरहिट झाले.

शिवाय अमितजींचा डान्सही लोकांना फार आवडला. शेवटी काय? तर ते म्हणतात ना की, “डर के आगे जीत है” तसंच काहीसं… हॅपी बर्थडे बच्चन सरजी! सध्या बच्चन साहेब ‘कौन बनेगा करोडपती १२ शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. ते रोज १२ ते १५ तास शूटिंग करतायेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही बच्चन साहेबंच्या घराबाहेर चाहते जमू शकतात असा अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचा बंगला जलसा बाहेरील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.