मित्रांनो! सोनी मराठीवर नुकत्याच सुरु झालेली ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडत आहे. मुक्ता आणि उमेश यांची जोडी प्रेक्षकांना आवडत असून या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळतं आहे. या जोडीला छोट्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना आवडतंय. मालिकेत मीरा आणि आदिराज यांचे काही फ्लॅशबॅक सीन्सही पाहायला मिळत आहेत.

‘अजूनही बरसात आहे’ मालिकेत उमेश आणि मुक्ता ही दोघं आपल्यापेक्षा १० वर्षं लहान वयाची भूमिका साकरताना दिसत आहेत. आपल्या पेक्षा लहान वयाची भूमिका साकारणं आव्हात्मक नक्कीच आहे. उमेशला तरुण दिसण्यासाठी क्लीन शेव करावं लागतं आणि त्यापुढचे काही दिवस तो वर्तमान काळातलं चित्रीकरण करू शकत नाही. मुक्ताचाही शॉर्ट हेअर लूक आणि शर्ट-जीन्स असा पेहराव फ्लॅशबॅक एपिसोड्समध्ये पाहायला मिळतो. या सर्व चित्रीकरणासाठी संपूर्ण टीमचा कस पणाला लागतो आणि उत्तम टीमवर्कमुळेच हे इतक्या छान प्रकारे होऊ शकतं.

‘अजूनही बरसात आहे’ मालिका १२ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. थोडी खुसखुशीत आणि अनेक रंगांनी भरलेली मीरा आणि आदी यांची ही प्रेमकथा रसिकांनाही आवडू लागली आहे. मुक्ता आणि उमेश यांनी ‘लग्न पाहावे करून’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. तब्बल ८ वर्षांनी ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा एकदा या मालिकेच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पाहायला मिळत आहे.

मालिकेमध्ये राजन भिसे, उमा सरदेशपांडे, समिधा गुरू, सूचिता थत्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे अशी कलाकार मंडळींच्याही भूमिका आहेत. मुक्ता आणि उमेश प्रेक्षकांच्या या आवडत्या जोडीसाठी तुफान प्रतिसाद मिळतो आहे. मालिकेचा पहिला लुक प्रेक्षकांसमोर आला  आणि प्रेक्षकांच्या मनात मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली होती. मालिकेच्या आजपर्यंतच्या सगळ्या प्रोमोंना, पोस्टर्सना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत,

याशिवाय रश्मी विसपुते नावाच्या एका चाहतीने स्वतःच्या घरात ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेची चक्क रांगोळी काढली आहे.  रश्मी ही नाशिकची असून मुक्ता आणि उमेश या दोघांची मोठी चाहती आहे. या  रांगोळीला सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळते आहे. मुक्ता आणि उमेश यांनीही रश्मीने काढलेली रांगोळी शेअर करून तिचे आभार व्यक्त केले आहेत.

मुंबई-पुणे-मुंबई, डबल सीट, जोगवा या आणि अशा अनेक दर्जेदार चित्रपटांद्वारे, सहजसुंदर अभिनयामुळे मुक्ता बर्वे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचली आहे. तर उमेश कामत हा तरुणींच्या गळ्यातला ताईतच. त्यानेही टाईम प्लिज, लग्न पाहावे करून अशा अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. चित्रपटांबरोबरच नाटक माध्यमातूनही उमेश आणि मुक्ता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता मालिकेत पुढे काय घडेल याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.