अगं बाई अरेच्चा, खबरदार, येरे येरे पैसा सारखे मराठी आणि वास्तव, इंडियन सारख्या हिंदी सिनेमातून आपल्या खास शैलीतील अभिनयाने प्रेक्षकांवर मोहर उमटवणारा अभिनेता म्हणजे संजय नार्वेकर. त्याच्या आवाजातील दमदारपणा आणि डोळ्यातली जरब ही त्याच्या अभिनयाची बलीस्थानं म्हणता येतील. आजवर सिनेमा आणि नाटकात संजयने खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत.

कॅफेमराठी आणि शिवाय इंटरनॅशनल प्रस्तुत, अभिषेक पारीख, निखिल रायबोले आणि भूपेंद्रकुमार नंदन निर्मित एका आगामी मराठी वेब सिरीज मधून संजय नार्वेकर पहिल्यांदाच वेब सिरीजमध्ये झळकणार आहे. या वेब सिरीजचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले असून. यात स्मिता शेवाळे, विनय येडेकर, विजय गोखले, सुनील होळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

क्रिकेट हा आज भारतातील सर्वात लोकप्रिय असा खेळ. आयपीएल आणि 20-20 मॅचेस मुळे या खेळाच्या लोकप्रियतेला उधाण आले आहे. क्रिकेट बघतांना अनेक तरुण क्रिकेटर होण्याची स्वप्न उराशी बाळगतात. हाच विषय परंतु जरा वेगळ्या धाटणीने साकारण्यात येत आहे. क्रिकेट आणि क्रिकेटचे ग्लॅमर आज तरुणांच्या मानगुटीवर बसले आहे. याच्या अवती-भोवती याचे कथानक गुंफण्यात आले आहे.

या वेब सिरीजमधून संजय नार्वेकर एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी संजय नार्वेकरने अशा प्रकारची भूमिका आजवर केलेली नाही. या भूमिकेसाठी अर्थात त्याला थोडा अभ्यास करावा लागला, परंतु बालपण मुंबईत गेल्याने त्याला फारसे कष्ट लागले नाहीत. ती भूमिका नेमकी काय काय? कशी आहे ? यासाठी तुम्हाला वेब सिरीजची वाट बघावी लागणार आहे.

संजय नार्वेकर सांगतो की, या वेब सिरीजच्या रूपाने मी डिजिटल विश्वात पदार्पण करतो आहे. कॅफेमराठी टीमने जेव्हा मला ही गोष्ट ऐकवली होता तेव्हाच मला ती आवडली होती. आदित्य गावडे आणि अनुपम पुरोहित यांनी या गोष्टीला छान फुलवले आहे. मला देखील काम करतांना खूप मज्जा आली. नाटक, सिनेमा नंतर सर्वात वेगाने वाढणाऱ्या डिजिटल माध्यमात मला काम करायला मिळाले याचा मला आनंद वाटतो आहे.