प्रतापगडावर नेमकं काय घडलं???
अनेक मराठी, हिंदी, इंग्रजी आणि तेलगु सिनेमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते मिलिंद गुणाजी प्रथमच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहेत. आजवर अनेक ऐतिहासिक व्यक्तिरेखा यापूर्वी त्यांनी सिनेमातून साकारल्या आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका त्यांनी प्रथमच ‘एक मराठा लाख मराठा’ या सिनेमात साकारली आहे. या सिनेमात महाराजांची भूमिका करण्याचे विशेष असे कारण आहे, त्याबद्दल ते खुलासा करतात…
यापूर्वी मराठी सिनेमात मी शहाजी महाराजांची भूमिका केली आहे. तसेच एका तेलगु सिनेमात मी कल्यणगिरी राजा ही ऐतिहासिक भूमिका केली आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला आजवर मिळाले नव्हते. एक दिवस गणेश शिंदे नावाचा तरुण मला भेटायला आला. त्याच्या सिनेमात मी काम करावं अशी त्यांची प्रांजळ इच्छा होती. मी आधी त्याला त्याचे अनुभव आणि सिनेमाचे कथानक विचारले. त्याने सिनेमाची गोष्ट सांगितली… आणि हा सिनेमा का करतोय याचं कारण देखील त्याने सांगितले. यापूर्वी दिग्दर्शनाचा कोणताही अनुभव त्याला नव्हता, सिनेमाचे बजेट देखील जास्त नव्हते, शिवाय माझे काम देखील जास्त नव्हते.. पण त्याची धडपड आणि काहीतरी वेगळे करण्याचे धाडस मला भावले म्हणून मी कसलाही विचार न करता त्याला होकार दिला.
प्रतापगडावर नेमकं काय घडलं? याबद्दल मिलिंद गुणाजी सांगतात की, या सिनेमात मी ज्याप्रकारे महाराजांची भूमिका साकारतो आहे त्यानुसार सिनेमात माझे दृश्य हे प्रतापगडावर चित्रित होणार होते. महाराजांच्या संपूर्ण वेशभूषेत मला गडाच्या वर जायचे होते. आता तुम्हाला सर्वांना माहितच आहे की मला ट्रेकिंगची आवड आहे, गड किल्ले माझा आवडता विषय आहे, आणि मला सवय असल्याने केवळ पंधरा मिनिटात मी प्रतापगडाच्या टोकाशी असायचो, पण सर्व सिनेमाचे युनिट यायला वेळ लागायचा आणि सर्वांची दमछाक व्हायची. तब्बल सोळा तास आम्ही गडावर चित्रण करत होतो. आजच्या आपल्या गड किल्ल्यांची अवस्था वाईट आहे याचे मला दु:ख होते. ट्रेकिंग करणारे काही मुलं अनेकदा आपल्या खिशातून पैसे काढून गड-किल्ल्यांची डागडुजी करतात. पण या सिनेमातून हा देखील एक संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे की सरकारने देखील पुढाकार घेऊन आपला हा ऐतिहासिक ठेवा जतन करावा, त्याची चांगल्याप्रकारे देखभाल करावी.