ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

लैंगिक शिक्षणाबद्दल आजही उघडपणे बोललं जात नाही. आपल्याला लैंगिक शिक्षणाचं महत्व उशिरा कळल. अलीकडे शहरांतील शाळा, कॉलेजमध्ये लैंगिक शिक्षण दिलं जात. पण ह्या विषयावरील प्रश्नांनाची उत्तरे ग्रामीण भागांमध्ये पोहचताना दिसत नाहीत. ‘सेक्स’ शब्द ऐकला तरी चार चौघांच्या भुवया उंचावतात. आत्ताच्या काळामध्ये अतिशय महत्वाच्या लैंगिक शिक्षणाबद्दल खुलेपणाने बोललं जात नाही.  लैंगिक शिक्षणाबद्दल अनेक प्रश्न त्यांची न मिळालेळी उत्तरे, समज गैरसमज, अज्ञान, सोशल मिडीयावरील अफवा थोडक्यात ह्या गोष्टींमुळे आपला रात्रीचा ‘घोळ’ होऊ शकतो.

हाच लैंगिक शिक्षणाबद्दलचा ‘घोळ’ ह्या आटपाडी नाईट्समध्ये दाखवला आहे. कधी हसवत कान धरत, चिमटे काढत खुसखुशीतरित्या सिनेमाची मांडणी नितीन सुपेकर यांनी केली आहे. गरजेपेक्षा एखाद्या सीनला उगीच न लांबवल्यामुळे पटकथेची मांडणी अत्यंत प्रभावी वाटते. प्रत्येक पात्राचे संवाद ताकदीचे असल्याने सिनेमा कुठेही कंटाळवाणा वाटत नाही.
लैंगिक शिक्षणावर आधारित विषय असला तरी कुठेही अश्लीलतेकडे झुकत नाही. खर तर सिनेमा मनोरंजनाबरोबर हसवत खेळवत वैचारिक डोस देखील पाजतो.

आटपाडी नावाच्या गावात वसंत खाटमोडे भल्यामोठ्या वाड्यात राहतो, कुटुंबात आई वडील, भाऊ वाहिनी, आणि भावाचा लहान मुलगा. वशाच वय लग्नाचचं पण काडी पहिलवान पाहून बारीक जावाई कोण करून घेईना. त्याच्या बारीक अंगाकडे पाहून त्याच स्थळ नाकारलं जातं. ह्यामुळे वडील बापूसाहेब खाटमोडे आणि आई लशुमी खाटमोडे मुलाच्या लग्नाच्या काळजीत आहेत. आत्तापर्यंत नऊ मुलींनी वशाला नकार दिलाय. मोठ्या भावापासून भावजईपर्यंत सगळेच त्याच्या लग्नासाठी प्रयत्न करत आहेत.

आटपाडी गावाजवळची हरिप्रिया एक सोज्वळ हळवी मुलगी. प्रियाचं वशासाठी स्थळ येतं आणि पहिल्या भेटीतच दोघेही एकमेकांना पसंत करतात. खाटमोडे कुटुंब आनंदान लग्नाची तयारी करतात. गावात पत्रिका देत असताना ‘तुझ्याच्यानी जमल का?’ अस अख्य गाव त्याच्या तब्बेतीवरून हिणवत आहेत. ह्याच दरम्यान ह्याच वशाचे मित्र त्याला शक्तीवर्धक गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. बंगाली बाबाकडून चूर्ण घेण्याचा आग्रह करतात. तब्बेतीचा न्यूनगंड असल्याने वशा शक्तीवर्धक गोळ्या घेतो. आणि त्यानंतर खरा सिनेमातला घोळ इथे सुरु होतो. ह्या घोळानी वशाला नकोनकोस करून सोडलय. त्यात त्याला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्याची बायको प्रिया त्याचा घोळ कसा सोडवते? वशाच्या प्रेमाचा जांगडगुत्ता कसा आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर मिळतील.

मात्र नितीन सुपेकर यांनी मांडलेला हा ‘घोळ’ मनोरंजन करतो. अर्थात सिनेमाची मांडणी, विषय उभी केलेली पार्श्वभूमी ह्या सगळ्या गोष्टी जमुन आल्या आहेत. दुनियादारी सिनेमातून परिचित झालेला अभिनेता प्रणव रावराणे याने त्याच्या पात्राला योग्य न्याय दिला आहे. सायली संजीवचा अभिनय उत्कृष्ट. सिनेमातला तिचा गावरान अंदाज लक्ष्यवेधी आहे. बापूसाहेब यांची भूमिका संदीप कुलकर्णी यांनी उत्तम बजावली आहे. संदीप कुलकर्णी यांच्या अभिनयाने चार चांद लावले अस म्हंटल तर वावग ठरणार नाही.सर्वच कलाकारांनी पात्रामध्ये जान ओतली आहे. नागराज दिवाकर आणि वीरधवल पाटील यांनी उत्कृष्ट धाटणीचे छायांकन केल्यामुळे सिनेमा आपल्या मनावर अधिक प्रभाव पाडून जातो. ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ हे गान थेटरमधून बाहेर पडताना गुंगुनावस वाटत.

मंडळी, एकंदरीत सिनेमाचा विषय पाहून सहकुटुंबाने हा सिनेमा पहिलाच पाहिजे.
मनोरंजन आणि शिकवण देणारा आटपाडी नाईट्स पाहायला येताय ना???