मित्रांनो!, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका माहिती नाही असा टेलिव्हिजन प्रेक्षक सापडणे दुर्मिळच. तब्बल दशक उलटून आणि ३२०० एपिसोड्स पूर्ण होऊनही ही मालिका अद्यापही रसिकांच्या मनांत मानाचे स्थान राखून आहे. जसे या मालिकेचे, तसेच या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे. या कलाकारांना ओळखत नाही असा चाहता मिळणे दुरापास्त.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या छोट्या पडद्यावरच्या लोकप्रिय मालिकेतील पात्र, ही पात्र साकारणारे कलाकार म्हणजे चाहत्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. मालिकेप्रमाणे यातील कलाकारांवरही प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच एखादा कलाकार मालिका सोडतो, तेव्हा चाहते हळहळतात. निराश होतात. दयाबेन अर्थात ही भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी शो सोडून गेली ती अद्याप परतलेली नाही.

यानंतर अंजली भाभीची व्यक्तिरेखा साकारणा-या नेहा जोशीने मालिकेला रामराम ठोकला. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी मालिकेत रोशन सिंह सोढीची भूमिका साकारणारे अभिनेते गुरुचरण सिंह यांनीही मालिका सोडली. गुरूचरण यांनी तब्बल १२ वर्ष या मालिकेत काम केलं होत.

गेल्यावर्षी त्यांनी ही मालिका सोडली. तेव्हा त्यांच्या निर्णयानं चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. गुरूचरण यांनी मालिका का सोडली, हे गुलदस्त्यात होतं. पण आता त्यांनी स्वत: या कारणाचा खुलासा केला आहे. आजतकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शो सोडण्यामागचं कारण सांगितलं.

मी तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडली तेव्हा यावर जास्त चर्चा झाली नाही. या मालिकेमुळं मला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करता आली. लोक मला आजही रोशन सिंह सोढी या नावाने ओळखतात. ही मालिका का सोडली, असा प्रश्न मला विचारल्या जातो. यामागं अनेक व्यक्तिगत कारणं होती.

माझ्या वडिलांची सर्जरी झाली होती. त्यामुळे मला त्यांच्यासोबत रहावं लागलं. तसेच कुटुंबाशी संबंधीत आणखी काही समस्या होत्या. त्यामुळे मला मालिका सोडावी लागली. मी जवळपास १२ वर्षे मालिकेत काम केले होते. त्यामुळे शो सोडण्याचं दु:ख नव्हतं, असं त्यांनी सांगितलं.

सध्या काय करताहेत सोढी? असा प्रश्नं त्यांना विचारला असता ते म्हणाले की, “मालिका सोडल्यानंतर मी जवळपास दोन महिने यूएसमध्ये होतो. सध्या मी स्वत:ला वेळ देत आहेत. स्वत:मध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे यावर काम करत आहे. आई-वडिलांसाठी देखील काम करत आहे. अलीकडे एका ब्रँडसाठी मी डिजिटल फिल्म शूट केली आहे,”