मित्रांनो!, दि. १५ जून २००१ रोजी तिकिट बुकिंग विंडोवर एक नव्हे तर दोन सुपरस्टारचे चित्रपट प्रदर्शित झाले. त्यादिवशी सकाळपासूनच वातावरण ‘लगानमय’ होते. त्यादिवशी प्रदर्शित झालेल्या ‘गदर – एक प्रेम कथा’ या दुसऱ्या चित्रपटाची चर्चा त्यामानाने कमीच होत होती. प्रत्यक्षात मात्र ‘गदर’ ने बॉक्स ऑफिसवर ‘लगान’ पेक्षाही जास्त पैसे मिळवले.

पैसा खर्च झाला, परंतु नाव प्रचंड झाले. ‘गदर’ आणि ‘लगान’ च्या बाबतीतही असेच घडले. असं म्हटलं जातं की ‘गदर’ साठी दिग्दर्शक अनिल शर्माची पहिली निवड गोविंदा आणि काजोल होती. ही गोष्ट इतक्यांदा बोलली गेली आहे की आता तीच खरी भासते, परंतु खुद्द अनिल शर्मा यांनी स्वत:च वस्तुस्थिती सांगितली आहे.

‘गदर’ ला २० वर्षे झाल्याच्या निमित्ताने “बॉलिवूड हंगामा” ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपट निर्माते अनिल शर्मा यांनी या सर्व अफवांवर भाष्य केले. अनिलने सांगितले की त्यांनी गोविंदाला ‘गदर’ साठी कधीच साइन केले नव्हते. अनिल आणि गोविंदा ‘महाराजा’ नावाच्या चित्रपटावर एकत्र काम करत होते. या चित्रपटाच्या सेटवर अनिलने गोविंदाला ‘गदर’ ची पटकथा सांगितली. पण ही भूमिका करण्यास उत्साही होण्याऐवजी उलट गोविंदाला टेन्शनच आले होते.

कारण एवढ्या भव्य आणि मोठ्या आवाक्याच्या चित्रपटाची निर्मिती करण्यास कोण सक्षम असेल, असे त्याला वाटले. चित्रपटाचा एक प्रमुख भाग शूट करण्यासाठी चक्क पाकिस्तानचा एक सेट भारतात उभारावा लागणार होता, जे त्या वेळी खूप कठीण काम होते. अनिल ठामपणे म्हणतो की ‘गदर’ साठी सनी देओल हीच त्याची पहिली पसंती होती.

आता राहिला तो काजोलच्या ‘गदर’ चित्रपटातील कास्टिंगचा प्रश्न? मग हे जाणून घ्या की तब्बल ४०० मुलींनी या चित्रपटासाठी अर्ज केला होता. अनिलच्या म्हणण्यानुसार त्याने आपल्या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अनेक लिडिंग नायिकांकडे सुद्धा संपर्क साधला होता. पण काहींना ही कथा आवडली नाही तर काहींना ही कथाच समजली नाही.

प्रसिद्ध नायिकांसोबत काम चालू नसताना अनिलने आपल्या चित्रपटात नवागत कलाकार कास्ट करण्याची योजना बनविली. त्याच्या चित्रपटात एकूण ४०० मुलींनी काम मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यापैकी ४० मुलींना शॉर्टलिस्ट केले गेले आणि ऑडिशन व स्क्रीन टेस्टसाठी बोलावले गेले. त्यातीच एक मुलगी अमीषा पटेल होती जी शेवटी ‘गदर’ मध्ये मुख्य भूमिकेसाठी निवडली गेली.

जरी ‘कहो ना प्यार है’ ‘गदर’ च्या आधी रिलीज झाला आणि ज्याने हृतिक रोशन आणि अमीषा पटेल दोघांनाही रातोरात सुपरस्टार बनवले. परंतु आपल्या पहिल्याच चित्रपटाच्या यशाने हवेत उडण्याऐवजी अमिषा पटेल ने आपला शब्द व संयम राखला. तिने ‘गदर’ मध्ये काम केले आणि स्वतःच्या स्टारडमला अधिकच उच्च स्तरांवर नेले.

अर्थात भविष्यात ती तिच्या यशस्वी पदार्पणाचा फायदा घेऊ शकली नाही ही बाब वेगळी. ‘गदर’ बद्दल असं म्हणतात की, बऱ्याच दिवसानंतर असा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला, ज्याला कोट्यावधी लोकांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिले. कमाईच्या बाबतीत तर या चित्रपटाने सलमानच्या ‘हम आपके हैं कौन’ चा विक्रम मोडला होता.