झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीनच्या निमित्ताने सध्या गंगा हे नाव भरपूर चर्चेत आहे. या कार्यक्रमात सूत्रसंचालनात अद्वैतला साथ देणारी ‘गंगा’ तृतीयपंथी असून मराठी मालिका विश्वात पहिल्यांदा एका तृतीयपंथी व्यक्तीला सूत्रसंचालनाची संधी मिळाली आहे.गंगाचं खरं नाव प्रणीत हाटे आहे. झी युवा च्या व्यासपीठामुळे गंगा आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मात्र तिचा प्रणित ते गंगापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
गंगा ला लहानपणापासून जे भोगावं लागलंय ते खरं तर विकृत आणि असंवेदनशील आहे डान्सिंग क्वीनच्या मंचावर बोलताना तिने आपला हा खडतर प्रवास बोलून दाखवला. आपला हा प्रवास सांगताना ती खूप भावूक झालेली पहायला मिळाली. “हाटे कुटुंबात पहिला मुलगा जन्माला आला तो मीच. जन्माला मुलगा आला पण तो आत्मा एका मुलीचा होता. मला लहानपणापासून एक सुंदर मुलगी होण्याची इच्छा होती. माझ्या वागण्याबोलण्यात ते दिसायचं त्यामुळे मी बाहेर कधी मुलांमध्ये खेळायला जायची तेव्हा हा बायल्या आहे असं सगळेच चिडवायचे.
माझ्यासोबत कोणीही राहायचंही नाही. शाळेत जेव्हा मला टॉयलेटला जायचं असायचं तेव्हा मधल्या सुट्टीत मला जायला मिळायचं नाही. तेव्हा क्लास सुरु असतानाच जावं लागायचं., तेव्हाही गेल्यानंतर माझी फार वाईट अवस्था व्हायची कारण क्लास सुरु असताना टॉयलेटला जाण्यासाठी हात वर केला की अजून दोन तीन मुले मुद्दाम हात वर यायचे आणि माझ्या मागे यायचे आणि … हे सर्व त्या वयात खरंच खूप तणाव निर्माण करणारं होतं. पण मी ते कधी घरच्यांना जाणवू दिलं नाही. कारण मला माझ्यासोबत हे नेमकं काय सुरु आहे हेच मला माहिती नव्हतं,” हे सर्व सांगताना गंगाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. फक्त आपण जे काही वागत आहोत त्याला बायल्या म्हणतात इतकंच कळत होतं.
मोठा झाल्यावर एका कार्यक्रमात मी साडी घालून नृत्य केलं तेव्हा तर माझ्यावर तू फक्त साडी घालण्याच्या लायकीचा आहे अशा कमेंट माझ्यावर करण्यात आल्या. आज झी युवा च्या व्यासपीठावर मी मानाने सांगते , हो मी साडी नेसण्यास तयार आहे. कारण माझ्यात तेवढी हिंमत आहे, आज माझ्या कुटुंबाचा आणि युवा डान्सिंग क्वीन च्या व्यासपीठाचा पाठिंबा मिळाल्याने गंगा आज इतक्या खंबीरपणे उभी आहे. मात्र भारतात असे कित्येक प्रणित आणि गंगा आहेत ज्यांना ना त्यांच्या कुटुंबाचा पाठिंबा नाही ना समाजात मान दिला जात नाही अशी खंतही गंगा ने बोलून दाखवली.
झी युवा वाहिनीवर दर बुधवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता लागणाऱ्या युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात पहिल्यांदा एका तृतीयपंथीला तिच्या कर्तृत्वाच्या जोरावर शो होस्ट करण्यासारखं मानाचं स्थान दिले आहे . झी युवाने आज नवीन विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे , महाराष्ट्रातील प्रेक्षक या नवीन विचारला योग्य ती साथ देतील अशी झी युवा या वाहिनीची अपेक्षा आहे.