फक्त मराठी सादर करत आहे हास्याचा नवीन नजराणा : गोकुळधामची दुनियादारी १८ डिसेंबर, २०१९ : गोकुळधामची अतरंगी पात्र येणार तुमच्या दारी, ह्यांची लफडी पडणार तुमच्यावर भारी. आता एकच निघणार हास्याची वारी, कारण भेटीला येतेय गोकुळधामची दुनियादारी… छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय असलेली गोकुळधाम सोसायटी २४ डिसेंबरपासून आता फक्त मराठी वाहिनीवर दिसणार आहे आणि तेही चक्क मराठीत! काय? हो हे खरंय. भारतातील सगळ्यात लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आता फक्त मराठी वाहिनीवर मराठीतून येत आहे. त्यामुळे “तारक…”च्या चाहत्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे.
गोकुळधाम सोसायटी ही गोरेगावच्या पावडर गल्लीमधील एक काल्पनिक सोसायटी आहे. नीला टेली फिल्म्सचा हा प्रसिद्ध शो गोकुळधाममधील अतरंगी पात्रांच्या रोजच्या आयुष्यावर आधारित आहे. या मालिकेमधील जेठालाल, दयाबेन, तारक, भिडे मास्तर, डॉ हाथी, रोशनसिंग सोढी, पत्रकार पोपटलाल, टप्पू आणि त्याची सेना अशी अनेक पात्रे लोकप्रिय आहेत. तसेच एपिसोड शेवटी मिळणाऱ्या तारकच्या उपदेशाच्या डोसचेही अनेक चाहते आहेत. आता हीच हास्याची वारी मराठीतून आणण्यासाठी फक्त मराठी वाहिनी सज्ज झाली आहे.
फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात, ‘एंटर१० नेटवर्क्स समूहाचा भाग असलेली फक्त मराठी वाहिनी आता कात टाकत आहे. नव्या आशयासह चित्रपट वाहिनीवरून आता आमची जनरल एन्टरटेनमेन्ट चॅनेल म्हणून वाटचाल सुरु झाली आहे. ‘गोकुळधामची दुनियादारी’ या नवीन शोच्या माध्यमातून गेले दशकभर भारतीय प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चषमा’चे मराठी व्हर्जन आणत असल्याचा आम्हाला आनंद आहे. यानिमित्त मनोरंजनविश्वात अशा उत्तम आशयाची निर्माती करणाऱ्या असित मोदी व त्यांच्या नीला टेली फिल्म्ससोबत काम करता येत आहे.
प्रेक्षकांना मनोरंजनाची ही मराठमोळी मेजवानी नक्की आवडेल असा आम्हाला विश्वास आहे.”
तारक मेहता का उल्टा चष्माचे हे नवे मराठी डब व्हर्जन प्रेक्षकपसंतीस कसे उतरते हे निश्चितच बघण्यासारखे ठरेल.