झी युवा’ वाहिनीवरील ‘साजणा’ मालिकेतील, रमाचा भाऊ, राजकुमार सुद्धा सध्या चर्चेत आहे. मालिकेतील ही एक प्रभावी भूमिका साकारत आहे, अभिनेता अजिंक्य ननावरे! या कलाकाराशी त्याच्या भूमिकेविषयी मारलेल्या या गप्पा;

१. साजणा मालिकेतील तुझ्या भूमिकेविषयी आम्हाला सांग.
राजकुमार हा रमाचा भाऊ आहे. राजकारणात नाव मिळवण्याची मनीषा तो मनी बाळगून आहे. त्यामुळेच स्थानिक राजकारणात प्रभाव असणाऱ्या व्यक्तींसोबत असण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. राजकारणात टिकून राहण्यासाठी, गरज पडेल ते करण्याची त्याची तयारी आहे. म्हणूनच, मनाने चांगला असलेला राजकुमार, प्रसंगी गैरमार्गाचा अवलंब करताना सुद्धा दिसतो. असं असूनही, कुटुंबाप्रती असलेले त्याचे प्रेम, जिव्हाळा याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. विशेषतः रमाविषयी त्याला अधिक आपुलकी आहे.

२. ही भूमिका आव्हानात्मक वाटते का? भूमिकेची तयारी कशाप्रकारे केलीस?
राजकुमार म्हणजे, काहीसं दिशाहीन आयुष्य जगणारा, छोट्या गावातील एक तरुण! मी माझ्या गावात सुद्धा असे अनेकजण पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांचे आयुष्य, जीवनाची पद्धत मला काही प्रमाणात ठाऊक आहे. त्यांचे जीवन पडद्यावर मांडणे हे नक्कीच आव्हानात्मक काम आहे. नाशिकजवळील एका छोट्याशा खेड्यात राजकुमार राहतो. तेथील भाषेचा लहेजा बोलण्यात आणण्याचा माझा प्रयत्न असतो. त्या भागातील विशिष्ट शब्द मी शिकून घेतले. भूमिकेत शिरून संवाद साधत असतांना, हे शब्द वापरणे मजेदार वाटते.

३. सहकलाकारांसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी काय सांगशील?
अभिजित चव्हाण, सुहास परांजपे यांच्यासारखे दर्जेदार कलाकार मालिकेत आहेत. त्यांच्यासोबत काम करणे म्हणजे एक मोठी पर्वणी आहे. या सेटवरील संपूर्ण टीमसोबत काम करत असतांना खूप काही शिकायला मिळते. अभिजित चव्हाण सेटवर असणे, म्हणजे कामातील आनंद द्विगुणित होण्यासारखे आहे. वातावरण हलकंफुलकं ठेवत काम करण्याची त्याची हातोटी उत्तम आहे. मुख्य भूमिकेत असलेले पूजा बिरारी आणि अभिजित श्वेतचंद्र अत्यंत मेहनती कलाकार आहेत. सेटवरची माझा खास मित्र, म्हणजे सुयोग गोरे! सगळ्यांची थट्टामस्करी करणे आणि मस्ती करणं, यात आम्ही दोघे, जोडीने नेहमी आघाडीवर असतो.

४. तुझं ‘स्टाईल स्टेटमेंट’ काय आहे?
साधे आणि आकर्षक रंगाचे टीशर्ट्स व जीन्स हा पेहराव मला फार आवडतो. आपल्याला सुटसुटीत वाटतील, आरामदायक ठरतील असे कपडे घालणे, हेच माझे स्टाईल स्टेटमेंट आहे. आपली स्वतःची ओळख जपणे व सत्त्व टिकवणे हे खरं स्टाईल स्टेटमेंट आहे, असं मी मानतो.

५. चित्रीकरणादरम्यानचा एखादा गमतीदार किंवा अविस्मरणीय अनुभव आम्हाला सांगशील का?
एकदा एक प्रसंग पावसात चित्रित करायचा होता. सगळ्यांनी मिळून, पाऊस आणि चित्रीकरण या दोन्हीचा झकासपैकी आनंद लुटला. मजा, मस्ती आणि शूटिंग अशा सर्वच गोष्टी हा सीन शूट करत असताना अनुभवता आल्या.