मराठी आणि हिंदीत विनोदाचा बादशहा आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून नावाजले जाणारे, विजय पाटकर तब्बल २० वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर परतणार आहेत. अनेक सुप्रसिद्ध हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांतील विनोदी भूमिकांचा दीर्घ प्रवास केल्यानंतर, पाटकर आपल्याला ‘दहा बाय दहा’ या विनोदी नाटकामधून मनोरंजन करताना दिसून येणार आहेत. विशेष म्हणजे, मराठीचा हा खंदा शिलेदार गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरच, म्हणजेच येत्या ६ एप्रिलला ‘दहा बाय दहा’ च्या शुभारंभाच्या प्रयोगाच्या दिवशीच नाट्यरसिकांसमोर उभा ठाकणार आहे. अनिकेत पाटील दिग्दर्शित ‘दहा बाय दहा’ या धम्माल विनोदी नाटकांत त्यांच्याबरोबर प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच विदिशा म्हसकर हा नवा चेहरादेखील या चौकडीत आपल्याला दिसून येईल

स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित ह्या नाटकाचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. या नाटकाचं लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केलं आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट घेऊन येत असलेलं हे नाटक, सामान्य माणसांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्यास प्रेरित करेल.

‘दहा बाय दहा’ च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावं लागतं, त्यानंतर त्यांच्यासोबत काय होतं? त्यातून ते कसा गोंधळ घालतात? हे सारं काही अगदी विनोदी ढंगात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. खास करून, विजय पाटकर यांचा कॉमेडी टच आणि त्यासोबतीला सुप्रिया पाठारे आणि प्रथमेश परब सारख्या विनोदवीरांची साथ लाभली असल्याकारणामुळे हे नाटक, ऐन गुढीपाडव्याला हास्याची नवी गुढी उभारण्यास सज्ज झालं आहे. त्यामुळे ‘दहा बाय दहा’ ची चौकट तोडणारं हे नाटक चौकटतोड विनोदाची अनुभूती नाट्यरसिकांना देऊन जाईल यात शंकाच नाही