बाणाई आणि म्हाळसादेवींमध्ये रंगणार सारीपाटाचा डाव!

 

 

 

बाणाईला जेजुरीतून हद्दपार करण्यासाठी हट्टास पेटलेल्या म्हाळसादेवी आणि खंडेरायांची दुसरी पत्नी म्हणून म्हाळसादेवींनी आपला स्वीकार करावा अशी आस बाळगणारी बाणाई, या दोघींमध्ये आज जेजुरी गडावर रंगणार आहे सारीपाटाचा अभूतपूर्व खेळ! याआधी म्हाळसादेवी आणि खंडेरायांमध्ये झालेल्या सारीपाटाच्या खेळात जिंकूनही आपण खंडेरायांना गमावल्याची सल म्हाळसादेवींना टोचत होती. अखेरीस नारदमुनींच्या आग्रहास्तव म्हाळसादेवींनी बाणाई समवेत सारीपाटाचा खेळ खेळण्यास सहमती दर्शवली. सारीपाटाच्या खेळाबद्दल अनभिज्ञ असलेल्या बाणाईला खुद्द खंडेरायांनी आणि नारदमुनींनी सारीपाटाचे डाव-प्रतिडाव शिकवले. गतजन्मात खुद्द पार्वतीदेवीकडून सारीपाटाचे धडे गिरवलेल्या बाणाईने फक्त खंडेरायांसाठी थेट म्हाळसादेवींशी सारीपाटाचा खेळ खेळण्यास होकार दिला.

आजच्या खेळात जर म्हाळसादेवी विजयी झाल्या तर बाणाई सूर्यास्तापूर्वी जेजुरीतून आपले बस्तान हलवेल आणि जर का बाणाईची सरशी झाली तर म्हाळसादेवी तिला खंडेरायांच्या दुसऱ्या पत्नीचा दर्जा बहाल करून जेजुरीत मानाचे स्थान देतील. बाणाई आणि म्हाळसादेवींच्या भविष्याची दिशा स्पष्ट करणारा सारीपाटाचा हा खेळ अत्यंत गुप्तपणे जेजुरीगडावर रंगणार आहे. सारीपाटाच्या खेळासाठी खंडेरायांनी नंदीची पंच म्हणून नियुक्ती केली आहे.

बाणाईच्या निःस्वार्थ भक्तीच्या आणि म्हाळसादेवींच्या अधिकाराच्या या लढतीत कोण ठरले अव्वल? खंडेराय रचणार का नवी शिवलीला? श्री. खंडेराय कोणाच्या बाजूने झुकते माप देतील? जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘जय मल्हार’चा विशेष भाग आज संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!