झी युवाची मालिका लव्ह लग्न लोचा सोमवारपासून नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला!!

 झी युवावर प्रेक्षकांची आवडती मालिका लव्ह लग्न लोचा आता एका नवीन वेळेवर दिसणार आहे. ही मालिका सध्या सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. यापुढे आता १८ डिसेंबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी युवा वाहिनीवर पहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेत प्रेक्षकांचं आवडतं जोडपं म्हणजेच विनय आणि आकांक्षा चे फायनली लग्न होणार आहे, विनय आकांक्षा चे लग्न, त्यानिमित्ताने त्याची आगळी वेगळी बॅचलर पार्टी, कोर्ट मॅरेज करताना येणारी धमाल, उडणारा गोंधळ, विनय आकांक्षाचा गृहप्रवेश  आणि लग्नानंतरच्या  पहिल्या रात्रीची  तयारी असे अनेक प्रसंगातून नवनवे लोचे या मालिकेत घडणार आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांना राघवाची मा साहेबाना भेटण्याची इच्छा होती त्या मा साहेब म्हणजेच अभिनेत्री शुभांगी लाटकर यांची एंट्री होणार आहे. या मालिकेला वर्ष होऊन गेले तरीही या मालिकेचा गोडवा काही संपत नाही आहे.

प्रेक्षकांच्या दृष्टीने लव्ह लग्न लोचा ही एक मस्त जमून आलेली मालिका आहे. ही प्रेक्षकांच्या मानसिकतेचा बारकाईने विचार करून गुंफलेली पटकथा आणि प्रत्येक कलाकाराचा (प्रचंड) अवाका अोळखून रचलेले प्रसंग, आणि कलाकारांनी त्यावर केलेली मेहनत पाहून लेखक,दिग्दर्शक  एक वेगळीच ऊर्जा घेऊन काम करत आहेत. या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा आता अनेकांच्या घरातील एक सदस्य झालेला आहे.राघव, विनय, अभिमान, शाल्मली , काव्या , आकांक्षा , श्रीकांत आणि राजा या सर्वांच्याच अभिनयाला प्रेक्षक मनापासून दाद देत आहेत. आतापर्यंत सुजाण प्रेक्षकांनी ज्याप्रमाणे या मालिकेला उदंड प्रतिसाद दिला भरभरून कौतुक केले असाच प्रतिसाद कायम राहील आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यामध्ये मालिकेची सर्व टीम आणि झी युवा वाहिनी तत्परतेने पुढे राहील.