Zee Marathi’s New Serial ‘Jaadu Bai Jorat’

1097

Zee Marathi’s New Serial ‘Jaadu Bai Jorat’

वजन हा आपल्या शरीराचा भाग असतो परंतू वजन म्हणजेच पूर्ण शरीर नसतं किंवा ती आपली ओळखही नसते. असं असलं तरी आपल्याकडे एखाद्याची शारिरीक व्याधी, व्यंग किंवा वेगळेपणा हा त्याची ओळख बनतो. म्हणजे कुणाची उंची कमी असेल तर त्याला बुटका, ठेंगणा म्हणणं, कुणाचं वजन जास्त असलं तर जाड्या म्हणणं असे प्रकार आपण करतो. यामध्ये अनेकदा समोरच्याची मस्करी करण्याचा प्रयत्न असतो तर कधी कमी लेखण्याचा पण यामुळे त्या व्यक्तिच्या भावनाही दुखत असतील याचा विचार फार कमी जण करतात. अशाच कमी लेखण्यातून काय घडू शकतं ? याची गंमतीदार गोष्ट बघायला मिळणार आहे ‘Jaadu Bai Jorat’ ‘जाडूबाई जोरात’ या झी मराठीच्या नव्या मालिकेमधून.
येत्या २४ जुलैपासून सोमवार ते शनिवार दुपारी १ वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सायंकाळच्या प्राईम टाईममध्ये मालिकांच्या मनोरंजनानंतर आता दुपारच्या नव्या वेळेतही झी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी ही खास मालिका घेऊन येत आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत.
‘Jaadu Bai Jorat’ ‘जाडूबाई जोरात’ मालिकेची कथा आहे जुईची. मध्यमवर्गीय घरातील एक स्त्री जिची संसार आणि नोकरी सांभाळण्याची तारेवरची कसरत सुरु आहे. जिच्या गरजा, स्वप्न मर्यादीत आहेत आणि स्वभावही साधा आणि सरळ. घरातील इतरांचा विचार करताना स्वतःकडे दुर्लक्ष झालेली अशी ही जुई. म्हणजे अगदी सकाळी उरलेल्या चपात्या किंवा भात रात्रीच्या जेवणात आधी आपल्या ताटात घेणारी. कधी शिळं पाकं खाणारी तर अन्न वाया जाऊ नये म्हणून तेही आपल्या वाट्याला घेणारी. या सवयीमुळेच हे सगळं खाणं अंगाला लागलेली आणि त्यातच वजन वाढलेली जुई. घराचा हा डोलारा सांभाळताना ऑफिसच्या कामाचाही भार उचलणारी आणि तिकडेही सर्वांच्या कामात मदत करणारी. सर्वांसाठी सर्व काही करणं हा तिचा स्वभाव असला तरी तिचा विचार मात्र कुणीच करत नाही. उलट तिच्या वाढलेल्या वजनावरुन घरी आणि ऑफिसमध्येही टिंगल उडवली जाते.
दुसरीकडे जुईच्या शेजारीच राहणारी मल्लिका ही तिच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. स्वतःकडे लक्ष देणारी, फिटनेस जपणारी आणि महत्त्वाकांक्षा असणारी. जुईचं हे मध्यमवर्गीय वागणं आणि ते जगणं तिला अजिबात आवडत नाही आणि तिचा जाडेपणाही तिला खटकतो. हीच मल्लिका जुईला तिच्या वाढलेल्या वजनावरुन एकदा सुनावते ज्यामुळे जुईचा अहंकार दुखावला जातो आणि मग ही जाडूबाई एक आगळा वेगळा निर्धार करते. याच जाडूबाईची गोष्ट म्हणजे ही मालिका.
आपल्या आगळ्या वेगळ्या विनोदी लेखनशैलीसाठी ओळखले जाणारे सुप्रसिद्ध लेखक राजेश देशपांडे यांच्या लेखनीतून उतरलेली ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

या मालिकेत जुईच्या भूमिकेत निर्मिती सावंत तर मल्लिकाच्या भूमिकेत किशोरी शहाणे या दोन लोकप्रिय अभिनेत्री आहेत. याशिवाय आनंद काळे, विघ्नेश जोशी, संचिता कुलकर्णी, सिद्धार्थ खिरीद, प्रदीप जोशी, संजीवनी समेळ, जयंत सावरकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ट्रम्प कार्ड प्रॉडक्शनने मालिकेची निर्मिती केली आहे.
सायंकाळनंतर सुरु होणा-या प्राईम टाईम मालिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलेल्या झी मराठी वाहिनीने आता दुपारच्या वेळेत ही खास मालिका आणली आहे. दुपारची वेळ म्हणजे गृहिणींची हक्काची वेळ आणि याच वेळेत त्यांना हक्काचं मनोरंजन मिळावं म्हणून ही मालिका सुरु करण्यात आली आहे. सायंकाळच्या मालिकांप्रमाणेच याही मालिकेला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा वाहिनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.


Jadu Bai Jorat Zee Marathi TV Serial Photo