शांताबाई फेम राधिका पाटीलची सिनेमात एन्ट्री 


एका गाण्याने रात्रीतून स्टार झालेल्यांची संख्या मराठीत खूप आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या शांताबाई गाण्याने फक्त मराठीच नाही तर इतर भाषिकांना देखील वेड लागले होते. लग्नाच्या वरातीपासून टीव्हीच्या शोजपर्यंत शांताबाई सगळीकडे वाजत होती. हीच शांताबाई गर्ल म्हणजे राधिका पाटील या एका  गाण्याने प्रचंड लोकप्रिय झाली. तिच्या सोशल मिडीयावर तर चाहत्यांचा अक्षरशः पाउस पडला. आता हीच शांताबाई गर्ल पहिल्यांदाच मराठी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिचा पहिला सिनेमा एक मराठा लाख मराठा आहे, जो येत्या २४ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
 
राधिका प्रोफेशनल लावणी डान्सर आहे. शांताबाई आधी देखील तिने अनेक मराठी अलबम केले होते. परंतु सुमीत म्युजिकच्या शांताबाईसाठी तिची निवड झाली आणि तिचे नशीबच बदलून गेले. गणेश शिंदे यांनी एक मराठा लाख मराठा या सिनेमासाठी मला एका महत्वपूर्ण भूमिकेसाठी विचारले तेव्हा माझा त्यावर विश्वासच बसला नाही. परंतु त्यांनी माझी भूमिका मला सांगितली तेव्हा मी काही वेळ सुन्न झाली. 
 
राधिका, आपल्या भूमिकेबद्दल सांगते कि, एकतर पहिल्यांदाच मी अभिनय करत होती, त्यात माझी भूमिका एका ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब घरातील मुलीची होती. मी गोरी असल्याने मला सावळी करण्यात आली. सिनेमातील नायकाच्या बहिणीची माझी भूमिका आहे. जिच्यावर अतिप्रसंग घडतो. हा सीन करतांना मला खरोखर जाणीव झाली की ज्या महिलांवर असा अत्याचार होतो त्यांच्यावर काय परिणाम होत असेल. लवकरच रुपेरी पडद्यावर तुम्हाला माझा अभिनय पाहता येईल. पहिल्याच सिनेमात मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, किशोर कदम, विद्याधर जोशी, उषा नाईक, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, भारत गणेशपुरे इ. मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्यासाठी मी गणेश शिंदे यांची खरोखर आभारी आहे.
 
आपल्या पुढील प्रवासाबद्दल राधिका सांगते कि, नृत्य माझी जान असली तरी आता डान्स सोबत अभिनयाला देखील मी प्राधान्य देणार आहे. आपल्या भूमिकेने लोकांनी आपल्याला ओळखावे अशी माझी अपेक्षा आहे. प्रामाणिकपणे माझा काम करण्यावर विश्वास आहे.
Shantabai Fame Radhika Patil Marathi Actress Photos