Lost and Found Marathi Movie review

 

सद्यस्थितीवर आधारित चित्रपट हा भवताली वावरत असलेल्या व्यक्तींचा, त्यांच्या मानसिक परिस्थितीचा विचार करायला भाग पाडतात. तसेच अशा चित्रपटांमुळे चौकटी बाहेरील जगाचे दर्शन होते आणि इतरत्र काय चालंल आहे याविषयी कळते. ‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटामध्ये व्यक्तींच्या एकटेपणाच्या भावनांचा विचार करण्यात आला आहे.

 

दिवसेंदिवस शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर माणसांची पण गर्दी देखील वाढत आहे. पण या माणसांच्या गर्दीतली काही माणसं मात्र गर्दीत एकटीच आहेत. हा विरोधाभास जरी वाटत असला तरी मूळ सत्य हेच आहे. जागतिक पातळीवर डिप्रेशन रेट भारतात सर्वाधिक असून अगदी फेसबुक, व्हॉट्सअप सारख्या व्हर्चुअल गर्दीत सुध्दा माणूस एकटा पडलाय. व्हॉट्सअपचा जमाना आहे राव…पण इकडे फक्त स्वत:ची सुखदु:खे शेयर केली जातात.  वास्तविक आयुष्यात एखाद्याच्या डोळ्यातील आसवं पुसायला पण कोणाला वेळ नाही आणि यासाठी प्रत्येक व्यक्ती अस्वस्थ आणि त्रस्त आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील एकटेपणाचा कोपरा दाखवणारा चित्रपट ‘लॉस्ट अँड फाऊंड’ हरएक व्यक्तीला नक्कीच भावूक करेल.

‘लॉस्ट अँड फाऊंड’ या चित्रपटाची कथा सिध्दार्थ चांदेकर, स्पृहा जोशी, डॉ. मोहन आगाशे, मंगेश देसाई यांच्यावर आधारित आहे.  स्पृहा-सिध्दार्थ यांनी ब-याच कालावधीनंतर एका वेगळ्या विषयावर चित्रपट केला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी एकटेपणा किती त्रासदायक असतो हे दाखवलं आहे. स्पृहा आणि सिध्दार्थ हे दोघेही वैयक्तिक आयुष्यात एकटे असतात. त्यांच्या एकटेपणाच्या भावनेतून ‘अँटी लोनलीनेस प्रोग्राम’ ची स्थापना होते आणि त्यातून त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांचा एकटेपणा दूर करता करता शेवटी या दोघांच्या भावनांचा प्रश्न उरतो. या दोघांच्या एकटेपणातून त्यांची प्रेमकथा सुरु होते का?  त्या दोघांनी पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काही गमवलंय का? जर त्यांनी गमवलं असेल तर नंतर त्यांना ते गवसतं का?  या सर्व प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर हा चित्रपट नक्की पाहा.

 
आयुष्यात आणि भावनांच्या विश्वात गमावण्याचा आणि गवसण्याचा प्रवास लेखक,दिग्दर्शक ऋतुराज धालगडे यांनी चित्रपटाच्या कथेत इतका सुंदरपणे मांडला आहे की प्रत्येकजण या चित्रपटाशी सहमत होतील. परंतु या चित्रपटाची पुरेपूर अशी प्रसिध्दी केली असती तर हा चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचायला अजून जास्त मदत झाली असती.  कारण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण हा त्याच्या आयुष्यात गमावलेला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना ते गवसलं तर नशिबच…

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here