स्वराज्यरक्षक संभाजी – अमोल कोल्हे साकारणार मोठ्या संभाजीच्या रूपात 

रक्षण्या स्वराज्य, मोठ्या रुपात सज्ज…स्वराज्यरक्षक संभाजी

डोळ्यांत धग सळसळत्या तेजाची
त्रिलोकी किर्ती शोभे शंभूराजाची

जगाच्या इतिहासात पराक्रमी योद्धा, राजकारणी, साहित्यिक, रसिक असं मिश्रण ज्या एकाच राजाच्या नशिबी आलं ते
म्हणजे छत्रपती श्री संभाजीराजे भोसले. संभाजीरांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले आपण झी
मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजीमधून जाणून घेतले. स्वत: शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली
शंभूराजांची जडणघडण घडताना आपण पाहिलं. पण आता स्वराज्य रक्षणासाठी शिवबांचा हा छावा मोठ्या रुपात
आपल्यासमोर येण्यासाठी सज्ज आहे. कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची तमाम प्रेक्षक वाट पाहात आहेत ते तरुण
तडफदार शंभूराजे प्रेक्षकांसमोर येण्याचा अखेर मुहूर्त ठरला. येत्या रविवारी, १७ डिसेंबर संध्या. ७ वा, दोन तासांच्या
विशेष भागात या मालिकेत तरुण संभाजीराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहे.


दोन तासांचा हा विशेष भाग मालिकेत नव्या घडामोडी घेऊन येत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मालिकेतल्या
एण्ट्रीसोबतच या विशेष भागात आग्र्याहून सुटेकनंतरच्या घडामोडींचा आढावा घेतला जाणार आहे. ब्राह्मण मुलाच्या
वेशातील बालसंभाजी अखेर राजगडावर पोहोचतात. त्यानंतर दोन वर्षे त्यांना औरंगाबादला पाठविण्यात येतं.
राजगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होतो. सोयराबाईंच्या पोटी युवराज राजाराम महाराजांचा
जन्म होतो. या सर्व शुभ घटनांना गालबोट लावून जातं जिजाऊंचं इहलोकी जाणं. रायगडावर सर्वाचं आगमन
झाल्यानंतर भूतकाळातील घटनांना उजळा मिळतो आणि यातून शंभूराजांचा भूतकाळ उलगडत जातो. त्यांची
नितिमत्ता, हळवेपणा, मातृ – पितृभक्ती आणि स्वराज्यभक्ती दिसून येते. अशातच संभाजीराजांचा फडशा पाडायचा
असा चंग बांधून कयुमखान चालून येतो. शूर आबांचे शूर छावे आता या आव्हानासाठी सज्ज आहेत. दोन तासांचा
विशेष भागात स्वराज्य बांधणीतल्या आणि शंभूराजांच्या जीवनप्रवासातल्या या आणि अशा अनेक महत्त्वाच्या
घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.


डॉ. अमोल कोल्हेने निर्मितीसोबत या भूमिकेचं आव्हानही पेललंय. या विशेष भागात रायगडावर मोठ्या येसूबाईंचंही आगमन होतं. मोठ्या येसूबाईंची भूमिका प्राजक्ता गायकवाड साकारत आहे. लहान येसू म्हणजे आभा बोडस आणि बालसंभाजी – दिवेश मेदगे यांनी आजवर या भूमिकांचं शिवधनुष्य पेललं आणि त्यांच्या बाललीलांमध्ये आपणही हरवलो. पण आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली. या दोघांनीही या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं. संभाजीराजांसारख्या हिऱ्याला पैलू पाडले जिजाऊंच्या संस्कारांनी. जिजाऊंचा करारी बाणा जपणारी, महाराष्ट्राची माऊली साकारणाऱ्या प्रतीक्षा लोणकर यांनीही आजवरचा हा प्रवास कायम लक्षात राहिल असं सांगितलं. येत्या रविवारी स्वराज्यरक्षक संभाजीचा हा दोन तासांचा विशेष भाग संध्या. ७ ते ९ या वेळेत दाखविण्यात येणार आहे.  शिवबाचा छावा स्वराज्यरक्षक संभाजी यांच्या शौर्यगाथेतलं आणखी एक महत्त्वाचं पान उलगडल जातंय तेव्हा
हा विशेष भाग पाहायला विसरु नका.