Actress Madhura Velankar & Rujuta Deshmukh IN Natya Karyashala

घडवा तुमच्या मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास!!
– १७ ते २९ एप्रिल दरम्यान अभिनेत्री मधुरा वेलणकर, ऋजुता देशमुख यांची नाट्य कार्यशाळा!!
उन्हाळ्याची सुटी म्हणजे मौजमजा… मात्र, मौजमजेला शिक्षणाची जोड दिली तर मुलांना त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. नाट्य कार्यशाळा हा त्याचाच एक भाग. नाट्य कार्यशाळेतून मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास होतो हे सिद्ध झालं आहे. मुलांच्या नाट्यगुणांना जोपासण्यासाठी आणि त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास करण्यासाठी अभिनेत्री मधुरा वेलणकर आणि ऋजुता देशमुख  यांनी १७ ते २९ एप्रिल दरम्यान साठ्ये कॉलेजमध्ये नाट्य कार्यशाळा आयोजित केली असून, लोकाग्रहास्तव यंदा तीन सत्रांमध्ये ही कार्यशाळा होणार आहे.
नाट्य, चित्रपट आणि टीव्ही मालिकांच्या क्षेत्रात मधुरा आणि ऋजुता गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ  कार्यरत आहेत. काहीतरी वेगळं करण्याच्या उद्देशाने त्यांनी २०१५ मध्ये पहिल्यांदा कार्यशाळा घेतली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद इतका होता, की पहिल्याच वर्षी दोन बॅच कराव्या लागल्या. मागच्या वर्षीही ही कार्यशाळा घेण्यात आली. यंदा पालकांच्या आग्रहामुळे तीन सत्रांमध्ये कार्यशाळा होत आहे. कार्यशाळेत मधुरा आणि ऋजुता यांच्यासह रजनी वेलणकर, नृत्य दिग्दर्शिका दीपाली विचारे मार्गदर्शन करतात. तसंच पाहुणे म्हणून शिवाजी साटम, सोनाली कुलकर्णी, सुमीत राघवन, राहुल देशपांडे, अमृता सुभाष यांनी हजेरी लावली आहे. आतापर्यंत झालेल्या कार्यशाळांचा मुलांना फायदा झाल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली आहे. पहिल्या कार्यशाळेत अभिनेता सुबोध भावेचा मुलगा कान्हा, सुशांत शेलारची मुलगी अन्वी, जयवंत वाडकर यांची
मुलगी स्वामींनी यांनीही सहभाग घेतला होता.
कार्यशाळेविषयी मधुरा वेलणकर यांनी माहिती दिली.
‘माझी आई रजनी वेलणकर अनेक वर्ष नाट्य कार्यशाळा घ्यायची. मी स्वत: नाट्य कार्यशाळेमध्ये सहभागी व्हायचे. त्यामुळे या कार्यशाळेचा उपयोग कसा होतो हे मला नेमकं माहीत आहे. नाट्य कार्यशाळा केलेलं प्रत्येक मुल कलाकारच झालं पाहिजे असं नाही. तर, त्याच्या आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठीचा आत्मविश्वास त्याला या कार्यशाळेतून नक्की मिळतो. कार्यशाळेतील खेळांमुळे मुलांमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्त्व, कल्पनाशक्ती अशा गुणांचा विकास होतो. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्य कार्यशाळा महत्त्वाची ठरते,’ असं त्यांनी सांगितलं.
‘नाट्य कार्यशाळेत येणाऱ्या मुलांना काम मिळवून देण्याची हमी आम्ही देत नाही. आमचा भर शिक्षणावरच आहे. या वयात मुलांनी कामापेक्षा अभ्यास, शिक्षण आणि खेळालाच प्राधान्य दिलं पाहिजे. नाटक हा शिक्षणाचाच एक भाग आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.
कार्यशाळेविषयी अधिक माहिती आणि सहभागी होण्यासाठी संपर्क: ९८२०१९२२७७, ७७३८५०४०७०.