संतोष कोल्हेंच्या ‘शॉककथा’ या वेब सिरीजमध्ये पहिल्यांदाच पडद्यावर हिजडा साकारणार छाया कदम !!

3472

आजपर्यंत आपण अनेक चित्रपटांमधून पुरुष कलाकारांना तृतीयपंथीयांच्या भूमिकेमध्ये पाहिलंय. परेश रावल, सदाशिव अमरापूरकर, आशुतोष राणा या नावाजलेल्या अभिनेत्यांनी  पडद्यावर हिजड्याच्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत. पण ‘व्हायरस मराठी’ या वेब सिरीजच्या निमित्ताने आता एक स्त्री कलाकार पहिल्यांदाच हिजड्याची  भूमिका करत आहे… आणि ती अभिनेत्री आहे फँड्री, सैराट अशा चित्रपटांमधून आपल्या सहज अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत एक कलाकार म्हणून आपला ठसा उमटविणारी Chhaya Kadam छाया कदम.

दिग्दर्शक संतोष कोल्हे यांच्या ‘व्हायरस मराठी’ या वेब चॅनेलवर येणाऱ्या ‘शॉककथा’ या सिरीजसाठी ‘हिजडा’ या एपिसोडची निर्मिती करण्यात आली असून यातच छाया कदम यांनी हिजड्याची  प्रमुख भूमिका केली आहे. या आगळ्यावेगळ्या भुमिकेबद्दल छाया कदम म्हणाल्या, ‘संतोष कोल्हेंनी जेव्हा मला ही कथा ऐकविली तेव्हाच मी ही भूमिका करायचाच असा निर्णय घेतला आणि पुढे आमचा प्रवास सुरु झाला हिजडा प्रत्यक्षात आणण्यासाठी…’’ निवडक मोजक्याच भूमिका करूनही प्रेक्षकांच्या मनात  स्थान मिळविलेल्या प्रतिभावान अभिनेत्री छाया कदम यांनी  हिजड्यासारखी आव्हानात्मक भूमिका करून अभिनय क्षेत्रात आपलं वेगळं अस्तित्व निर्माण करण्याकडे नक्कीच वाटचाल सुरु केली आहे.

या शॉककथा मुकेश माचकरांनी लिहिलेल्या असून त्यांचं दिग्दर्शन संतोष कोल्हेंनी केलेलं आहे. या शॉककथेच्या बाबतीत संतोष कोल्हे यांनी सांगितलं, ‘’बऱ्याच दिवसांपूर्वीपासून माझ्या मनात होतं आजपर्यंत हिजड्याची भूमिका फक्त पुरुष कलाकारांनीच केल्या आहेत पण स्त्री कलाकार कधी या भूमिकेमध्ये दिसली नाही. म्हणून मी ‘हिजाडा’ची कहाणी आधी छायाला ऐकविली आणि या भूमिकेसाठी छायाचा होकार आल्यानंतर लगेच तिची लुक टेस्ट आणि स्क्रीन टेस्ट  घेतली गेली. आणि आम्ही सगळं चित्रीकरण अॅक्च्युअल लोकेशनवरच केलंय.’’
बरीच रिहर्सल्स करून चित्रीकरणासाठी दिवस ठरवला गेला. चित्रीकरणाच्या दिवशी व्हायरस मराठीची सगळी टीम कल्याणला याच एपिसोडमधील कलाकार अक्षय शिंपी याच्या घरी जमली. तिथेच छायाचा आणि अक्षयचा मेकअप वगैरे करून परत एकदा रिहर्सल केली आणि नंतर सगळे निघाले स्टेशनच्या दिशेने. सगळी टीम ट्रेनमध्ये चढली आणि बघतात तर काय, ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती कि हलायला सुद्धा जागा नव्हती. त्यांना वाटलं आता काय शूट करणार? सगळा प्लान फिसकटतोय कि काय असे वाटत होते पण दोन स्टेशननंतर गर्दी बरीच कमी झाली आणि हिजडाच्या शुटींगला सुरुवात झाली. सबंध प्रवासात शूट केलं गेलं. छायाचा अभिनय तर एवढा अप्रतिम होता कि काही लोकांनी तिला खरोखरीचा हिजडा समजून पैसे सुद्धा दिले आणि इतरही बऱ्याच गमतीजमती झाल्या. शुटींग दरम्यान लोकलमधल्या प्रवाशांनी सुद्धा व्हायरस मराठीच्या टीमला खूप चांगलं सहकार्य केलं. हिजडा शूट करणं हा सगळ्यांसाठीच एक वेगळा अनुभव होता आणि यासाठी सगळ्या टीमने खूपच उत्साहाने काम केलं.